नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज कोविड-19 चा सार्वजनिक आरोग्य प्रतिसाद आणि ९ राज्ये , केंद्रशासित प्रदेशांच्या लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेतला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्या उपस्थितीत त्यांनी छत्तीसगड, गोवा, हिमाचल प्रदेश, पुदुच्चेरीचे आरोग्य मंत्री आणि अंदमान आणि निकोबार बेटे, चंदीगढ , दादरा नगर हवेली, दमण आणि दीव, लद्दाख आणि लक्षद्वीप यांचे नायब राज्यपाल , प्रशासक यांच्याशी संवाद साधला.
लसीकरण मोहिमेचे निर्णायक महत्त्व विशद करीत मंत्र्यानी अधोरेखित केले की, भारताने आपल्या नागरिकांना लसीच्या एकूण १९,१८,८९,५०३ मात्रा दिल्या आहेत.ते म्हणाले की , देशात लस उपलब्धता वाढविण्यासाठी सरकार लस उत्पादकांना पाठिंबा देण्याच्या सक्रिय प्रक्रियेत सरकार आहे. त्यानंतरच्या महिन्यांत देशात लसीच्या उत्पादनात घसघशीत वाढ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या कालावधीत भारत लसीच्या २१६ कोटी मात्रा खरेदी करेल तर यावर्षी जुलैपर्यंत ५१ कोटी मात्रांची खरेदी केली जाईल. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी असेही म्हटले आहे की, वर्षाच्या अखेरीला देशात किमान सर्व प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण झाल्याची स्थिती असेल.