नाशिक – जिल्ह्यासह राज्यात नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये भाजपाने घवघवीत यश मिळवले आहे. तीस नगरसेवक निवडून येऊन भाजपा नाशिक जिल्ह्यात नंबर वन ठरला आहे. असे असतानाही केंद्रीय मंत्र्यांना धक्का अशा बातम्या विरोधकांकडून हेतुपुरस्कर पसरवल्या जात आहे. वास्तविक पाहता कळवण नगरपरिषदेत भाजपचे तीन नगरसेवक होते व आता त्यांची संख्या दोन झाली. आणि सत्ताधारी पक्षाचे पूर्वी आठ नगरसेवक होते ते आता नऊ झाले परंतु विरोधक प्रसिद्धी माध्यमांतून असे आव आणत आहेत जणूकाही त्यांचे १७ पैकी १७ निवडून आले आणि भाजपला एकही जागा मिळाली नाही . त्यामुळे एक जागा कमी झाल्याने एवढा मोठा धक्का आहे याचे मला आश्चर्य वाटते. गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद असो वा अन्य निवडणूक असो स्वकीयांशी संघर्ष करत पक्ष बदल करून भारतीय जनता पक्षाने मोठ्या उमेदीने एक सामान्य महिलेला जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे मनापासून आभार मानते.
काही स्वकीय आमचे दैवत स्व. ए.टी.पवार यांचे नाव घेऊन राजकारण करत आहेत परंतु त्याच दादासाहेबांना २०१४ साली ज्यांच्यामुळे पराभव पत्करावा लागला आज ते त्यांच्याच मांडीला मांडी लावून राजकारण करत आहेत. ही कुठली नैतिकता ? वास्तविक पाहता कळवण विधानसभेत कळवण नगर परिषद व सुरगाणा नगर परिषदेत निवडणूक झाल्या. परंतु सुरगाणा नगर परिषदेत राज्यात सत्ता असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला केवळ एक जागा मिळाली याबद्दल त्यांना धक्का लागला नाही का ? माझ्या लोकसभा मतदार संघात दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, देवळा, निफाड येथे नगरपरिषदेचे निवडणुका झाल्या. नगरपरिषद निवडणुका काळात दिल्ली येथे हिवाळी अधिवेशन सुरू होते. कोरोनाचे संकट असताना आणि त्यावर नियोजन करण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरू होते. याही परिस्थितीत नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतल्या मतदारांनी भाजपावर पुन्हा विश्वास दाखवला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केल्याप्रमाणे मवीअ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती व सत्तेचा गैरवापर आणि नाशिक जिल्ह्यात विरोधात वजनदार नेते असताना देखील भारतीय जनता पक्षाचे जास्त उमेदवार निवडून आले त्याबद्दल काही प्रसारमाध्यमे काहीच बोलत नाही याचे खरच आश्चर्य वाटते ? माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायतींना कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे व यापुढेही केंद्र सरकारच्या माध्यमातून विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहिल. असो जनतेने दिलेला कौल हा आम्हाला मान्य असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन, जनतेचे आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळाच्या जोरावर यापुढे कितीही अडचणी आल्या तरी आम्ही सामान्य जनतेचे निस्वार्थपणे काम करत राहू.