मुंबई – निफाड सहकारी साखर कारखाना मर्या. पिंपळस, ता.निफाड यांच्या मालकीच्या १०८ एकर क्षेत्र ड्रायपोर्ट करीता जे.एन.पी.टी.,मुंबई यांना हस्तांतरण करण्याबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार या मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होत्या. त्या अनुषंगाने डॉ.भारती पवार यांनी गेल्या १५ दिवसांपूर्वी सदर विषयाबाबत बैठक आयोजित करण्याबाबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समक्ष भेटून विनंती केली होती. त्यानुसार आज १९ जुलै रोजी महाराष्ट्र शासनाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीस सहकार मंत्री, जेएनपीटीचे अध्यक्ष आदी अधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्ली येथून सहभागी झाल्या. महाराष्ट्र शासनाने योग्य ती आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून निफाड सहकारी साखर कारखाना मर्या. पिंपळस, ता.निफाड यांच्या मालकीच्या १०८ एकर जागा ड्रायपोर्ट करीता तात्काळ उपलब्ध करून द्यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री यांनी केली. तसेच डॉ.भारती पवार यांनी हे देखील नमूद केले की सदर प्रकल्प हा नाशिक जिल्हा तसेच उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्वपूर्ण असून त्यासाठी केंद्र सरकारकडून हवे ते सहकार्य मिळवून देण्याबाबत आपण पूर्णपणे कटिबद्ध आहोत.