विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात कोरोना संसर्गाचा दर कमी अधिक प्रमाणात सर्वाच ठिकाणी आढळत आहे. सध्याच्या परिस्थितीत देशातील ७१८ जिल्ह्यांपैकी दोन तृतीयांश जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी संसर्गाचा दर १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे, त्या जिल्ह्यांमध्ये सहा ते आठ आठवड्याचा लॉकडाउन लवण्याची गरज आहे, असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्त केले आहे.
मंगळवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या नव्या म्युटेंटमुळे तरुणांमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. कामाच्या निमित्ताने तरुण सर्वाधिक प्रवास करतात त्यामुळे त्यांना अधिक प्रमाणात लागण होत आहे. दुसर्या लाटेत ४० वर्षांवरील लोकांना आरोग्याच्या समस्यांमुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत आहे. या वयोगटातील लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे, असे ते म्हणाले.
देशात आगामी काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. या लाटेचा परिणाम लहान मुलांवर सर्वाधिक होऊ शकतो, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे. परंतु पहिल्या आणि दुसर्या लाटेचा संसर्ग झालेल्या वयोगटात जास्त अंतर नाही. त्यामुळे तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक आहे, असे मत आता व्यक्त करणे घाईचे ठरेल, असे त्यांनी सांगितले.
देश गंभीर संकटात
कोरोना महामारी संपली असा चुकीचा समज करून भारताने आधीच निर्बंध शिथिल केल्यामुळे सध्या देशात कोरोनाने गंभीर रूप धारण केले आहे, असे अमेरिकेचे वरिष्ठ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथोनी फौची यांनी म्हटले आहे. कोरोनाचा मोठा तडाखा भारताला बसला आहे. अनेक राज्यात बेड, ऑक्सिजन, औषधे, कर्मचारी आणि लशीच्या तुटवड्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. त्यामुळे भारतात काही आठवड्यांचे लॉकडाउन लावण्याची गरज असल्याचे डॉ. अँथोनी फौची यांनी सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!