पुणे – आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे मंगळवारी (१० ऑगस्ट) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातील लोकांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांची कीर्ती जगभरात पसरलेली आहे. त्यांच्या उपचारपद्धतीचा राज्यातीलच नव्हे तर परदेशातील लोकांनाही फायदा झाला आहे. बालाजी तांबे यांनी यशापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली. लहानपणीच्या आठवणींना त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उजाळा दिला होता.
लहानपणीची आठवण सांगताना ते रमले होते. ते सांगतात, की “लहान असताना आमच्या येथे मोठा भाजीबाजार भरायचा. एका एजन्सीकडून आम्ही वस्तू विकायचे काम घेतले होते. ज्या दिवशी मला सुट्टी असेल किंवा मला वेळ असेल मी बाजारात बसायचो. साबण, पोमेड विकायचो. त्याच वस्तू रविवारी गळ्यात ट्रे अडकवून विकायचो.” आयुर्वेदाकडे ते कसे वळले याबाबत त्यांनी किस्सा सांगितला. ते सांगतात, “माझ्या बाबांचे ३६ व्या वर्षी लग्न झाले होते. तोपर्यंत ते बेडाघाटला एका गुरूंकडे राहायचे. शास्त्र, योग, शक्तिपात शिकायला गेले होते. गुरूंनी बाबांना सांगितले, की तू घरी जा, लग्न कर आणि तुझा पहिला मुलगा मला झोळीत दे. बाबाही मला हे असेच काम करायचे आहे, असे सांगायचे. तसेच त्यांनाही आयुर्वेदाबाबत उपजत समज होती,” असे ते म्हणाले.