नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील ऐतिहासिक वस्तुंचा ठेवा असणाऱ्या चिचोली गावातील शांतीवन परिसरातील संशोधन केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ एप्रिल रोजी आभासी पद्धतीने लोकार्पण होणार आहे. राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या समारंभास उपास्थित राहणार आहेत. या कार्यक्राच्या तयारीला वेग आला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सामाजिक सांस्कृतिक प्रशिक्षण केंद्राच्यावतीने शांतीवन ही भव्य वास्तु उभारण्यात आली आहे. १००८ वस्तुंच्या संग्रहासह या परिसरात वैशिष्टयपूर्ण वास्तुकलेतून विद्यार्थी वसतिगृह, सामूहिक प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षकांकरिता निवासस्थाने आदी ८ इमारती उभारण्यात आल्या आहेत. यापैकी संशोधन केंद्राच्या इमारतीचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
लोकार्पण समारंभाला राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय भूपृष्ठवाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, केंद्रीय संसदीय कार्य व सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आदी उपस्थित राहणार आहेत.
शांतीवन येथील वस्तु संग्रहालय व इमारतींविषयी
बाबासाहेबांच्या वैयक्तिक वापराच्या १८८ प्रकारातील १००८ वस्तुंचे रासायनिक प्रक्रिया करून जतन व संरक्षण करण्यात आले आहे. यात देशाचे संविधान लिहिण्यासाठी बाबासाहेबांनी वापरलेले टाईप रायटर, बॅरिस्टर कोट, बाबासाहेबांच्या धम्मदीक्षा समारंभातील बौद्ध मूर्ती , त्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तुंचा समावेश आहे. या वस्तू ऐतिहासिक वारसा म्हणून जपण्यात येत आहेत.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून शांतीवन वास्तुसह येथील विविध प्रकल्पांकरिता भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला. यातून विद्यार्थी वसतिगृह, सामूहिक प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षकांकरिता निवासस्थाने आदी इमारती उभारण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाकडूनही शांतीवन वास्तु परिसरातील प्रकल्पांकरिता प्राप्त झाला आहे. या निधीतून संशोधन केंद्र व विद्यार्थी वसतीगृह बांधकाम, संशोधन केंद्राकरिता साहित्य, अंतर्गत रस्ते, पाणीव्यवस्था, अस्तित्वात असलेल्या संग्रहालयाचे नुतनीकरण आदी कामे करण्यात आली आहेत.
Dr Babasaheb Ambedkar Historic Items Museum