मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याची भूमिका डॉ. अमोल कोल्हे यांनी केल्याने यावरुन वाद निर्माण झाला आहे. डॉ. कोल्हे हे अभिनेते असले तरी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे गोडसेच्या कार्याचे समर्थन करायला लागले आहेत का, अशी टीका होत आहे. यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
डॉ. टोपे म्हणाले की, डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलेला व्हाय आय किल्ड गांधी हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा ४५ मिनिटांचा आहे. डॉ. अमोल कोल्हे आज मला भेटले. विविध विषयांवर आमची तासभर चर्चा झाली. डॉ. अमोल कोल्हे यांची खरी ओळख ही अभिनेता ही आहे. ते अतिशय लोकप्रिय अभिनेता आहेत. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उत्कृष्ट भूमिका त्यांनी केल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडे सर्व जण आदराने पाहतात. आता त्यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका केली आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे आणि त्यांनी केलेल्या भूमिकेकडे अभिनेता म्हणून पहावे. ते कलावंत असल्याने त्यांनी या भूमिकेचा विचार केला आहे. त्यामुळे आपण अशा बाबींकडे कलेच्या भूमिकेतूनच पहावे, असे मत डॉ. टोपे यांनी व्यक्त केले आहे.