नाशिक – सातपूरला १९९३ च्या शहर विकास आराखड्यात छेड छाड करून पश्चिमेचा रस्ता पुर्वेकडे वळवण्यात आला आहे. हा रस्ता पुर्वीच्याच आराखड्यानुसार विकसित करावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असून याबाबत थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालण्यात आले. दरम्यान तक्रारीची दखल घेऊन मंत्र्यांनी मनपा आयुक्तांना चौकशी करण्याची सूचना केली असल्याचे शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख देवा जाधव यांनी सांगितले.
सातपूर परिसरातील पपया नर्सरी ते साईबाबा मंदिर हा १८ मीटरचा रस्ता १९९३ च्या विकास आराखड्यात पश्चिमेकडे दर्शविला आहे. सद्यस्थितीत हा रस्ता विकसित करण्याचे काम सुरु असून सदर रस्ता हा पश्चिमेकडून न करता पूर्वेकडून विकसित केला जात आहे. काही बलाढ्य भांडवलदारांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकास आराखड्यात छेडछाड केल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. शहरातील अनेक रस्ते डीपी प्लॅन नुसार विकसित झाले आहेत. मात्र पपया नर्सरी येथील रहदारी वस्तीतील रस्ता डीपी प्लॅन बदलून विकसित केला जात आहे. नगररचना विभागाचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यात मोठी आर्थिक उलाढाल होऊन आराखड्यात छेडछाड करण्यात आल्याने भविष्यात अनेक गोरगरीबांच्या घरांवर हातोडा पडण्याची शक्यता आहे. हा रस्ता पुन्हा पश्चिमेकडूनच करावा अशी मागणी जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.