नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हुंड्याच्या मागणीसाठी केलेल्या छळासाठी सासरचा प्रत्येक सदस्य आरोपी होऊ शकत नाही. तक्रारकर्त्याने आरोप केला असेल तर त्याने छळ केल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी संबंधित सदस्याने छळ केल्याचा पुरवा सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक छोट्या भांडणाला छळ म्हटले जाऊ शकत नाही. असे मत नोंदवत न्यायालयाने एका महिलेने हुंड्यासाठी छळ केल्याच्या खटल्यातून आरोपी सासरच्या सदस्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
दिल्लीतील तीस हजारी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजीव कुमार यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार, सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळातून महिलेला सुरक्षा मिळावी यासाठी हुंडा छळ कायदा तयार करण्यात आला आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून या कायद्याचा दुरुपयोग करण्याचा जणू काही पूरच आला आहे.
लग्नानंतर लहान-सहान भांडणांमध्ये सासरच्याच लोकांनाच नव्हे, तर छळाचा आरोप करून इतर नातेवाईकांनाही खोट्या प्रकरणांमध्ये अडकवले जात आहे असे मत देशातील अनेक न्यायालयांनी वेळोवेळी नोंदवले आहे. संबंधित व्यक्ती अशा आरोपातून मुक्त झाले असले तरी त्यांना मानसिक आणि शारिरीक त्रास सहन करावा लागला आहे.
चांदणी चौक परिसरात राहणाऱ्या एका महिलेने चार वर्षांपूर्वी २०१८ मध्ये पती आणि सासू-सासरे यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि विश्वासघात केल्याचा खटला दाखल केला होता. कनिष्ठ न्यायालयाने आरोप निश्चित केले होते. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध आरोपी सासू-सासऱ्यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णय बदलला आहे.