मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे (वय ६४) यांचे प्रदीर्घ आजाराने आज येथे निधन झाले. तब्बल चार दशके त्यांनी वृत्त निवेदनाचे काम केले. सह्याद्री वाहिनीवरील मराठी बातम्यांचे निवेदन ते करीत असत. त्यामुळेच ते अतिशय लोकप्रिय होते.
वृत्तवाहिन्या येण्यापूर्वी सह्याद्री या सरकारी मराठी वाहिनीवर ते बातम्यांचे निवेदन करीत असत. त्यांच्या आवाजातील बातम्या ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर असत. विज्ञान शाखेतून पदवी आणि रानडे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली होती. त्यांनी काही काळ बहुराष्ट्रीय खासगी कंपन्यांमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्य केले. त्यानंतर ते दूरदर्शनचे वृत्तनिवेदक म्हणून कार्यरत झाले. तिच त्यांची खरी ओळख बनली. त्यांचा भारदस्त आवाज आणि उत्कृष्ट वृत्त निवेदनाची पद्धत प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहे. त्यांनी आजवर शेकडो कार्यक्रमांचे निवेदन आणि सूत्रसंचलन केले. प्रदीप भिडे हे शिक्षक दाम्पत्याचे पुत्र होत.
प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत आज मालवली. त्यांच्या निधनामुळे विविध स्तरातून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
https://twitter.com/airnews_pune/status/1534142344286842881?s=20&t=K6xAh52ZtpVE4s8RiyHE0w