नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध स्टार्ट अप योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज नाशिक शहरातील हॉटेल केवल येथे अनिकेत आडके आणि लक्ष्मण वाल्मिकी यांनी सुरु केलेल्या फिरत्या डीझेल विक्री वाहनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी राठोड पेट्रोलियमचे संचालक श्री.सुभाष राठोड, रवींद्र आसवले, काशिनाथ शिरसाठ, मंगेश चावरिया, श्री.अनिकेत सुर्यकांत आडके, श्री.लक्ष्मण ढोलकीया, श्री.सूर्यकांत आडके यांच्यासह आडके व ढोलकीया कुटुंबातील सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी या उपक्रमाबद्दल शुभेच्छा देत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एक विशेष व्यवसाय म्हणजे “ डोअर टू डोअर डिझेल डिलिव्हरी बिझनेस ” सुरू केला आहे.या माध्यमातून डिझेलची घरोघरी पुनर्विक्री केली जाणे शक्य झाले आहे. डोअर स्टेप डीझेल डिलिव्हरी वाहनाच्या माध्यमातून डीझेल ग्राहकाला जागेवर डीझेल उपलब्ध होणार असल्याने पैशांची व वेळेची बचत देखील होणार आहे.
तसेच कारखाना, उद्योग, वाहतूक वाहने, बिल्डिंग कॉम्प्लेक्स, मॉल किंवा बँक्वेट हॉल, कृषी यंत्रसामग्री,हॉस्पिटल,मोबाईल टॉवर,जेसीबी त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी डीझेल उपलब्ध होऊ शकेल असे त्यांनी सांगितले.