नाशिक – भगूर परिसरातील दोनवाडे भागात बिबट्या जेरबंद झाला आहे. सत्यवान कांगणे या शेतकऱ्याच्या मळ्यामध्ये दोन दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला होता. त्वयात ४ वर्षीय बिबट्या जेरबंद झाला आहे. मात्र, देवळाली कॅम्प परिसरात बिबट्याची दहशत असल्याचे दिसून येत आहे. रेस्ट कॅम्प रोड परिसरातील कासार मळा येथे चंद्रकांत कासार यांच्या घराच्या मागील बाजूस पहाटे साडेचार वाजता बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केला. त्यात कुत्रा ठार झाला आहे. याबाबत वन विभागाला कळविण्यात आले आहे. त्यामुळे कासार मळा येथे मंगळवारी पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वन विभागाने सांगितले आहे.
गेल्या आठवड्यापासून दोन वाडे शिवारात सातत्याने बिबट्यांचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. रात्रीच्या सुमारास या बिबट्यांनी अनेक पाळीव प्राणी व कुत्र्यांना आपल्या भक्षस्थानी पाडले आहे. मागील आठवड्यात शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान शेतकऱ्यांना एकाच वेळी तीन बिबट्यांनी दर्शन दिले होते.
सत्यवान कांगणे यांच्या उसाच्या शेताजवळ दोन दिवसापूर्वी पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यामध्ये आज पहाटेच्या सुमारास चार वर्षीय नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे. त्यास वनविभागाने ताब्यात घेतले आहे. त्यातच कासार मळ्यात बिबट्याची दहशत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे स्पष्ट होत आहे. दरम्यान वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.