इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोनावर मात करण्यासाठी देशभरातील अनेक राज्यांमध्ये लशीकरण मोहीम अद्यापही सुरूच आहे, लशीचा पहिला डोस पूर्ण झाल्याने अनेकांना दुसरा डोस देण्यात येत आहे. काही ठिकाणी दोन्ही डोस पूर्ण झाले असून बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू आहे. परंतु असे असतानाही लशीकरणाची सक्ती करू नये, अशी मागणी होत असून काही ठिकाणी चक्क लशीकरणाला देखील विरोध होत आहे, ग्रामीण भागात काही जण लस घेण्यास नकार देत आहेत.
देशातील कोरोना लशीकरण मोहिमेबाबत बहुसंख्य ठिकाणी जागरुकता निर्माण झाली असली तरी अजूनही काही नागरिक असे आहेत की, जे कोरोनाची लस घेण्याबाबत प्रचंड घाबरतात आणि जेव्हा लशीकरणाची वेळ येते तेव्हा ते चक्क पळून जातात. देशात सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेसंदर्भात दररोज वेगवेगळ्या प्रकारचे फोटो व्हिडिओ समोर येत आहेत आणि सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत.
असाच एक व्हिडिओ उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून समोर आला आहे. लसीला विरोध करणारे काही लोक विचित्र गोष्टी करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यात कोणी झाडावर चढत आहे तर कोणी लस टाळण्यासाठी नदीत उडी मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ बलिया जिल्ह्यातील रेवती हद्दीतील असून हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
https://twitter.com/ANI/status/1484021829220339715?s=20
उत्तर प्रदेशातील बलियामध्ये एक व्यक्ती कोविड लशीचा डोस न देण्याचा आग्रह धरताना दिसला. यादरम्यान लस देण्यासाठी आलेल्या टीमच्या सदस्यासोबत या व्यक्तीची बाचाबाचीही झाली. मात्र, त्या व्यक्तीने नंतर लशीकरण करण्याचे मान्य केले. त्याच वेळी, आणखी एक व्हिडिओ देखील बलिया जिल्ह्यातील आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती कोविड लसीचा डोस न घेण्याचा आग्रह करत झाडावर चढताना दिसत आहे.
त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला झाडावरून खाली उतरवले आणि त्याला कोविड लसीचा डोस दिला. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात तेव्हा ८९ जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. सध्या जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या ५१२ झाली आहे. त्याचबरोबर एकूण १८६ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या ३२५ आहे.
https://twitter.com/ANI/status/1484024212197355521?s=20
बलियाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडे यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट झपाट्याने पसरत आहे. त्याच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात दररोज सुमारे ७५ पथके पाच हजारांहून अधिक नमुने गोळा करण्यासाठी कार्यरत आहेत. कोरोना लशीकरणही युद्धपातळीवर केले जात असून त्याबाबत जनजागृतीही केली जात आहे. मात्र नागरिकांनी स्वतःहून लस घेण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.