विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या मध्यम आणि गंभीर प्रकारच्या संक्रमणाने ग्रस्त असलेल्या रूग्णांच्या उपचारांमध्ये रक्त पातळ करण्याचे औषध वापरले जात आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतरही काही लोकांना या औषधांचा सल्ला दिला जातो. मात्र कोरोनामुक्त झाल्यावर हे औषध बिलकुल घेऊ नका, असा सल्ला दिल्लीस्थित ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) डॉक्टरांनी दिला आहे.
एम्सचे औषध विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. नीरज निश्चल म्हणाले की, कोरोनामधून बरे झालेल्या प्रत्येक रूग्णाला रक्त पातळ करणारी औषध घेण्याची गरज नाही. जर एखाद्या रुग्णाला आधीच काही आजार असेल किंवा रक्त गोठण्याची शक्यता असेल तरच अशी औषधे दिली पाहिजे. मात्र लोकांनी केमिस्टकडून औषध घेऊन स्वत: चे रक्त पातळ करु नये. कारण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रक्त पातळ करणे देखील प्राणघातक ठरू शकते.
प्रो. डॉ. नीरज निश्चल पुढे म्हणाले की, आजकाल सर्व लोकांना स्टिरॉइड्स आणि रक्त पातळ करणारी औषधे व प्रतिजैविक औषधांची माहिती मिळाली आहे. तसेच लोकांनी दुकानातून औषधे घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे औषधांचा गैरवापर झपाट्याने वाढला आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.
वास्तविक, कोरोनामुक्त झाल्यावर रक्ताने पातळ औषध घेण्याची गरज नाही. जर एखाद्यास आधीच हृदयरोग झाला असेल तर वॉल्व बदलला असेल, रक्तवाहिन्यांमधे अडथळा येण्याची किंवा स्ट्रोकच्या रूग्णाची शक्यता असते, अशा लोकांना रक्त पातळ करणार्या औषधाची आवश्यकता असते. मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गाने बरे झालेल्या प्रत्येक व्यक्तीस या औषधाच्या वापरामुळे अंतर्गत रक्तस्त्राव देखील होऊन ते प्राणघातक ठरू शकते.