मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात कोरोना आणि विशेषतः ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवे निर्देश प्रसिद्ध केले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव होण्यापूर्वी त्यांची ओळख पटविण्यासाठी सर्व राज्यांनी कोविड चाचण्या वेगाने करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.
ज्या नागरिकांना ताप, डोकेदुखी किंवा घसादुखीच्या तक्रारी आहेत, त्यांनी कोरोनाची चाचणी करणे आवश्यक आहे. अशा तक्रारी असलेल्या नागरिकांना कोरोना संशियताच्या रुपाने पाहिले जाणार आहे. त्यानुसारच त्यांचे विलगीकरण आणि उपचार व्यवस्था करण्यात यावी. असे दिशानिर्देश केंद्राने सर्व राज्य सरकारांना दिले आहेत.
ही लक्षणे असू शकतात
ओमिक्रॉन या रुपाचे जास्त लक्षणे दिसून येत नाहीयेत. अनेक रुग्णांना खूपच सौम्य किंवा फ्लूच्या लक्षणांशी मिळते जुळते असू शकतात. कोरोनारुग्ण आहे की नाही हे रुग्णांना अजिबात कळत नाही. त्यामुळे ते नकळतपणे इतर नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावण्यास कारणीभूत ठरतात. ओमिक्रॉनवर ताबा मिळविण्यासाठी अशी लक्षणे असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देशही आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.
खोकला, घसा दुखणे, श्वास घेण्यास त्रास, अंगदुखी, चव जाणे किंवा गंध न येणे अशा कोणत्याही लक्षणांकडे गंभीरतेने पहायला हवे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. अशा रुग्णांना कोरोनाचा संशयित मानून त्वरित चाचणी करणे आवश्यक आहे. डेल्टा रुपापेक्षा ओमिक्रॉन हा ७० पटीने अधिक संक्रामक आहे. त्यामुळे जास्त सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.