देवळा : ऑक्सिजन अभावी कोविड रुग्णांची अवस्था गंभीर होत आहे. अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे अशा परिस्थितीत रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी पिंपळगाव ( वा.) व गुंजाळनगर येथील दोघे तरुण उद्योजक स्वतः पुढाकार घेतात व कोरोना केयर सेंटर साठी स्वखर्चाने ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन उपलब्ध करून कोविड रुग्णांचा प्राणवायू होऊन इतरांना प्रेरणा देतात. त्यांच्या या कृतीचे सर्व थरातून कौतुक होत आहे.
कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, गंभीर झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेडची अत्यंत आवश्यकता आहे परंतु जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी रुग्णालये फुल झाली आहेत. वेळेवर ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. ऑक्सिजन बेड उपलब्ध होईपर्यंत रूग्णांना ऑक्सिजन मिळावा म्हणून तहसीलदार दत्तात्रय शेजुळ व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी सोशल मिडिया च्या माध्यमातून व्यक्ती व संस्थांना ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन उपलब्ध करून देण्यासंदर्भात आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पिंपळगाव (वा.) येथील उद्योजक मनोज कापसे व मुन्ना धोंडगे यांनी स्वखर्चातून स्वयंचलित ऑक्सिजन तयार करणाऱ्या ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन देवळा तालुका कोविड सेंटरला भेट देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. ऑक्सिजन यंत्रांमुळे आता अनेक गंभीर कोरोना रुग्णांना मदत होणार आहे. यावेळी तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ, तालुका आरोग्यधिकारी डॉ. सुभाष मांडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव आदी उपस्थित होते.
आपण गप्प कस बसणार ?
आपण नैसर्गिक आपत्ती आल्यावर शासनाला नेहमीच मदत करत असतो. मंदिरांसाठी मोठमोठ्या देणग्या देत असतो. परंतु आज संपूर्ण मानवजातीवर भयंकर अस संकट आलेल असतांना आपण गप्प कस बसणार? बर्याचशा पेशंटला ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे मृत्यू ओढवतोय. संपूर्ण राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजन मशीन घेवून ग्रुप, संस्था, मंडळ, ट्रस्ट यांच्या माध्यमातुन आपण गरजूंना ऑक्सिजनची मदत करू शकतो.
मनोज कापसे, उद्योजक, पिंपळगाव (वा.)