मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाकिस्तानात बसलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि गुंड दाऊद इब्राहिम याचे साथीदार आणि काही हवाला ऑपरटरांच्या २० ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्थे(एनआयए)ने मुंबईत छापेमारी केली आहे. नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार आणि इतर ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.
एनआयएने माहिती दिली, की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या जवळच्या व्यक्तींच्या ठिकाणांवर एनआयएकडून झडती सुरू करण्यात आली आहे. अनेक हवाला ऑपरेटर आणि ड्रग पेडलरचा दाऊदशी संबंध आहे, यासंदर्भात एनआयएने जानेवारी महिन्यात कारवाई केली होती.
दहशतवादी कारवाया, संघटित गुन्हेगारी आणि भारतात अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने डी कंपनीचे नेतृत्व आणि ऑपरेटर यांच्या सहभागाशी संबंधित एनआयएने यावर्षी फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यांच्याविरुद्ध बेकायदेशीर कामे प्रतिबंध कायदा (यूएपीए) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
पाकिस्तानमधील कराचीमध्ये लपून बसून दाऊद इब्राहिम अंडरवर्ल्ड नेटवर्क चालवतो. त्याचे भारतातील साथीदार अनेक बेकायदेशीर कामे, गुन्हेगारी आणि दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असून, या सर्व प्रकरणाचा तपास एनआयए करीत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने २३ फेब्रुवारीला अटक केली होती. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या मन लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयाने नवाब मलिक यांच्याविरुद्ध पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.
https://twitter.com/ANI/status/1523532549540421632?s=20&t=MoS1GINjAylYddReTi1w_g