नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशांतर्गत विमान कंपन्यांमार्फत प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याने देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्रात प्रभावी वाढ झाली आहे. विविध देशांतर्गत विमान कंपन्यांनी प्रदान केलेल्या प्रवासी वाहतूक माहितीच्या आधारे, जानेवारी – मे 2023 दरम्यान प्रवासी संख्येने 636.07 लाख इतका प्रभावी टप्पा गाठला आहे, जो मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 36.10% लक्षणीय वार्षिक वृद्धी दर दर्शवितो. जानेवारी – मे 2022 या कालावधीत देशांतर्गत विमान कंपन्यांमार्फत प्रवास करणाऱ्यांची संख्या 467.37 लाख होती.
मे 2022 मध्ये देशांतर्गत विमान प्रवासी संख्या 114.67 लाख होती, जी मे 2023 मध्ये वाढून 132.41 लाख झाली असून प्रवासी संख्येने 15.24% ची मासिक वाढ नोंदवली आहे. प्रवासी संख्येतील ही सातत्यपूर्ण वाढ सुरक्षित, कार्यक्षम आणि ग्राहक-केंद्रित विमान वाहतूक परिसंस्थेला चालना देण्यासाठी विमान कंपन्या, विमानतळे आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे. एप्रिल 2023 च्या तुलनेत मे 2023 मध्ये एकूण प्रवासी संख्येत 3.26 लाख (2.52%) वाढ झाली आहे.
प्रवाशांच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राची ताकद आणि टिकाऊपणा दर्शवते. यासोबतच संपर्क सुविधा सुधारण्यासाठी तसेच देशातील नागरिकांना सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सरकार करत असलेल्या निरंतर प्रयत्नांची ही परिणीती आहे. जानेवारी – मे 2023 दरम्यान 636.07 लाख प्रवाशांचा उच्च भार घटक हवाई वाहतुकीची वाढती मागणी सूचित करतो, तसेच यातून विमान वाहतूक उद्योगाची अनुकूल दिशा अधोरेखित होते. तसेच, मे 2019 च्या तुलनेत मे 2023 मध्ये तक्रारींची संख्या देखील कमी झाली आहे. मे 2019 मध्ये, देशांतर्गत विमान कंपन्यांबाबत एकूण 746 प्रवाशांशी संबंधित तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तर मे 2023 मध्ये देशांतर्गत विमान कंपन्यांबाबत एकूण 556 प्रवाशांशी संबंधित तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
“विमान वाहतूक क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि भारताला एक प्रमुख जागतिक हवाई वाहतूक केंद्र म्हणून स्थापित करण्यात सर्व हितधारकांच्या सहयोगी प्रयत्नांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे मत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केले. देशांतर्गत विमानसेवा उद्योगाचा सतत होणारा विस्तार आणि प्रादेशिक विमान कंपन्यांची स्थापना या बाबी आपली अर्थव्यवस्था मजबूत करत आहेत, सोबतच देशभरातील लोकांना एकमेकांशी जोडत आहे आणि उडान योजनेद्वारे शेवटच्या टप्प्यापर्यंतची संपर्क सुविधा सुनिश्चित करत आहे, असे ते म्हणाले. सुरक्षा, मजबूत कार्यक्षमता आणि प्रवाशांच्या समाधानाची सर्वोच्च मानके सुनिश्चित करत विमान वाहतूक उद्योगाची भरभराट होण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठीही मंत्रालय वचनबद्ध आहे.” असेही ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले. काळजीपूर्वक आणि कसून नियोजन, कार्यात्मक परिणामकारकता आणि हवाई वाहतूक उद्योगाने केलेल्या सक्रिय कृतींचा परिणाम म्हणून हे यश प्राप्त झाले आहे.