ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नियतीने ठरविले तर कुठल्याही व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या वाट्याला अपार दुःख येऊ शकते. कधी कधी तर अश्या घटना घडतात की त्या ऐकल्या तरी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीला हळहळ वाटावी. अशीच एक घटना डोंबिवलीत घडली आहे.
एकाच कुटुंबातील लोकांचा विविध कारणांनी मृत्यू होण्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. पण डोंबिवलीतील ही घटना फारच दुर्दैवी आहे. यामध्ये बहीण आणि भावाला आलेला मृत्यू ह्रदय पिळवटून टाकणारा आहे. कारण पाळीव प्राण्यावरील प्रेमाच्या कारणाने बहीण आणि भावाला हा मृत्यू पत्करावा लागला आहे. डोंबिवलीतील दावडी परिसरातील ही घटना आहे.
डोंबिवली पश्चिम भागात असलेल्या उमेश नगरमध्ये हे बहीण भाऊ आपल्या कुटुंबासह राहायचे. रणजित रविंद्रन आणि कीर्ती रविंद्रन अशी भावा-बहिणीची नावे आहेत. एक त्यांच्या घरी एक पाळीव कुत्रा आहे. या कुत्र्याला अंघोळ घालून देण्यासाठी बहीण-भाऊ तलावावर गेले. त्याला तलावावर अंघोळ घालण्याची ही पहिली वेळ नव्हती. दावडी परिसरातील या तलावावर ते नेहमीच जात असे. यावेळी सुद्धा ते पाण्यात उतरले. पण त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि कुत्र्याला अंघोळ घातलाना दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
आई-वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले असल्याने त्यांना ही दुःखद घटना फोनवर कळविण्यात आली. हसत्या खेळत्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील दोन तरुण मुलांचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर अग्नीशमन दल आणि पोलीस तलावाच्या ठिकाणी दाखल झाले. जवळपास तासभर प्रयत्न केल्यानंतर बहीण-भावाचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
डॉक्टर व्हायचे स्वप्न!
रणजित रवींद्रन याला डॉक्टर व्हायचे होते. त्यामुळे त्याने बारावीत प्रचंड परीश्रम घेत चांगले गुण मिळविले आणि मेडिकलला प्रवेश घेतला. आता तो एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला होता. पण अचानक ओढवलेल्या मृत्यूमुळे त्याचे स्वप्न अर्धवट राहिले आहे. कीर्तीने यंदाच बारावीत प्रवेश घेतला होता.
Dombivli Brother Sister Death Pet Dog