नवी दिल्ली – दक्षिण दिल्लीच्या मेहरोली भागात गेल्या तीन ते चार दिवसांदरम्यान १० कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तीन कुत्र्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुत्र्यांच्या तोंडातून फेस येत असल्याने त्यांना कोणीतरी विषारी पदार्थ खाऊ घातल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. परंतु त्यांची देखभाल करणा-या व्यक्तीने त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे स्थानिक लोक भयभीत झाले आहेत.
येथील गीता कॉलनी येथे हसन यांचे दुकान आहे. त्यांनी १० कुत्रे पाळले आहेत. बुधवारी सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांना एका कुत्र्याच्या तोंडातून फेस येत असल्याचे निदर्शनास आले. वेदनेने तडफडत असताना तो तोंड आणि डोळेही खाजवत होता. एका खासगी रुग्णालयात कुत्र्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हसन यांच्या इतर चार कुत्र्यांचा पुढील दोन दिवसात त्याच रुग्णालयात मृत्यू झाला. आणखी तीन कुत्र्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कुत्र्यांशी खेळणारे इतर पाच निराधार कुत्र्यांचाही असाच मृत्यू झाला, असे हसन यांनी सांगितले.
सिंहाचा मृत्यू
त्यापूर्वी दिल्लीतील प्राणी संग्रहालयात रविवारी (९ मे) दुपारी ७ वर्षीय सिंहाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या एक महिन्यापासून अमन नावाचा सिंह आजारी होता. त्याच्यावर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू होते. सिंहाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. तरीही प्राणी संग्रहालय प्रशासनाने त्याचा मृतदेह बिसरा येथे तपासणीसाठी पाठविला आहे. सिंहाच्या शरीराच्या आतील भागांनी काम करणे बंद केल्यामुळे तो खूपच अशक्त झाला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्राणी संग्रहालयाचे संचालक रमेश कुमार पांडेय यांनी सांगितले.