विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
माणसांना कोरोनाची बाधा झाली आहे की नाही ही अचूक माहिती सांगण्यास आरटीपीसीआर चाचणीप्रमाणे कुत्रासुद्धा सक्षम आहे. हे ऐकण्यास थोडे विचित्र वाटत असले तरी फ्रान्सच्या वैज्ञानिकांनी एक संशोधन केले आहे. वास घेण्यासाठी प्रशिक्षित केलेले कुत्रे माणसाच्या घामाच्या वासावरून संबंधित व्यक्ती कोरोनाबाधित आहे की नाही याची अचूक माहिती देऊ शकतात, असे संशोधनात आढळून आले आहे. एवढेच नाही तर असे कुत्रे कोविड स्क्रिनिंग एका मिनिटात करण्यासाठी सक्षम आहेत. तर रॅपिड अँटिजेन टेस्टद्वारे १५ मिनिटात कोरोना संसर्गाचे निदान होते.
पॅरिसच्या नॅशनल वेटरनरी स्कूल ऑफ एल्फोर्डच्या संशोधनकांना आढळले की, कुत्रे आपल्या वास घेण्याच्या क्षमतेच्या आधारावर माणसांमधील कोरोना संसर्गाचा ९७ टक्के अचूक अंदाज लावू शकतात. डॉमिनिक गँडजीन सांगतात, माणसाचे शरीर कोरोना संसर्गाविरोधात जी प्रक्रिया देतात ती त्यांच्या घाम आणि लाळेतून दिसते. त्याचा वास घेऊन कुत्रे ओळखू शकतात.
प्रथमच वापर
ग्रँडजीन म्हणाले, आतापर्यंत स्फोटके किंवा अमली पदार्थांचा शोध घेण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. परंतु कोरोना काळात प्रथमच कुत्र्यांच्या वास घेण्याच्या क्षमतेचा उपयोग कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी करण्यात येणार आहे.
पेनेसोल्वेनिया स्कूल ऑफ वेटरनरी मेडिसिन डॉग सेंटरसुद्धा सध्या कुत्र्यांच्या वास घेण्याच्या क्षमतेवर संशोधन करत आहे. यामध्ये लस घेतलेल्या व्यक्ती आणि बाधा झालेल्या व्यक्तींचा कुत्र्यांद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे झाल्यास अशा प्रशिक्षित कुत्र्यांची मागणी वाढणार आहे.
कुत्र्यांची क्षमता
एका आंतरराष्ट्रीय टास्क फोर्सला आढळले की, एक कुत्रा एका दिवसात ३०० माणसांचे कोविड स्क्रिनिंग करू शकतो. त्यासाठी संबंधित व्यक्तीला थेट संपर्कात येण्याची गरज नाही. अँटिजेन टेस्ट करताना स्वॅब घेण्यासाठी जसे संपर्कात येतो तशी गरज भासणार नाही आणि खूपच कमी साहित्य वापरून कोरोनाची चाचणी करता येणार आहे. फिनलँडच्या हेलसिंकी-वांता आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोरोनाबाधित लोक शोधण्यासाठी अशा कुत्र्यांना तैनात करण्यात आले आहे.