इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या धकाधकीच्या काळात माणसाला मोठ्या प्रमाणावर तणावाचा सामना करावा लागतो आहे. कौटुंबिक, कार्यालयीन ताण, अनेकदा मोकळेपणाने बोलायला कोणी नसणे या आणि अशा अनेक कारणांमुळे मानवी जीवनात नैराश्याचे प्रमाण वाढते आहे. यातूनच आत्महत्येचे प्रमाण वाढते आहे. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे जी शक्ती माणसाकडे नाही, ती शक्ती कुत्र्यांकडे आहे. अनेकदा आपल्या जवळचा माणूस ताणाखाली आहे हे, आपल्याला काळात नाही. पण कुत्र्यांना ही गोष्ट ओळखता येते. कुत्रे माणसाचा तणाव वासाने सुद्धा ओळखू शकतात. पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्सने नव्याने प्रकाशित केलेल्या अभ्यासात हे संशोधन नोंदवण्यात आले आहे.
क्वीन्स युनिव्हर्सिटी, बेलफास्ट येथे पीएचडी करणाऱ्या क्लारा विल्सन यांनी सांगितले की “जेव्हा एखादी व्यक्ती तणावग्रस्त असते तेव्हा तिच्या शरीरात एक विशिष्ट प्रकारचा दर्प तयार होत असतो. पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजेच एखाद्या गंभीर घटनेनंतर येणारा तणाव अनुभवणाऱ्या अनेकांना मानसोपचार तज्ज्ञांकडून भावनिक आधार देण्यासाठी प्रशिक्षित श्वानांसह म्हणजेच सर्व्हिस डॉगसोबत राहण्याचा सल्ला दिला जातो.
कुत्रे हे शरीरातील बदल लगेच ओळखतात. काही प्राण्यांना दूरच्या दृष्टीची, काहींना लांबून ऐकण्याची शक्ती असते त्याप्रमाणेच कुत्र्यांना भावनिक बदल ओळखण्याची शक्ती मिळाली आहे. कुत्रे दृश्य व गंध यांच्या आधारे मानवी भावना समजून घेऊ शकतात. VCA प्राण्याच्या रुग्णालयातील पशुवैद्य रायन ल्लेरा व लिन बुझार्ड यांनी सांगितल्याप्रमाणे माणसाच्या ज्ञानेंद्रियातील रिसेप्टरच्या पेशी ६० लाखापर्यंत असतात. तर कुत्र्यांमध्ये ही संख्या १ कोटी इतकी आहे. तसेच गंधावरून बदल ओळखण्याची मेंदूमधील क्षमताही माणसांपेक्षा ४० पटअधिक आहे.
तणाव हे वेवेगळ्या प्रकारचे असतात. एखादी व्यक्ती शारीरिक किंवा मानसिक आव्हानांमुळे त्रासलेली आहे ती तणावग्रस्त असते. काही व्यक्तींमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते. या व्यक्तींमध्ये तो न्यूनगंड निर्माण झाल्यास त्यातून तणाव येतो. या नकारात्मक विचारांच्या विळख्यात अडकून राहिल्यास कालांतराने यातून शारीरिक आजारही उद्भवण्याची शक्यता असते. अनेकदा तणावामुळे रक्तदाब घटण्याची तसेच हृदयाची गती वाढण्याचे धोके असतात, असे संशोधन सांगते. तणावग्रस्त व्यक्ती या कोणत्याही परिस्थितीला अधिक हळव्या होतात असे या अभ्यासातून दिसले आहे. अनेकदा यामागे भीती असते. जेव्हा आपल्या शरीरात भीतीमुळे भावना वाढतात त्यावेळी वैज्ञानिकदृष्ट्या रक्त आणि हार्मोन्सचा प्रवाह बदलतो. यामुळे, एक विशिष्ट गंध तयार होतो.
जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तेव्हा त्यातूनच काही सेंद्रिय अंश बाहेर पडतात. या अंशांचा गंध ओळखून कुत्रे तुमचा तणाव आणि इतरही आजार समजून घेऊ शकतात. सहसा अशा प्रकारचे सेंद्रिय अंश हे आपल्या मूत्र, विष्ठा व लाळेत असतात, त्यामुळे या तीन घटकाच्या आधारे ओळखता येणारे आजार हे कुत्रे केवळ गंधावरून ओळखू शकतात. फुफ्फुस, मूत्राशय तसेच स्तनाचा कर्करोग ओळखण्यासाठी याची मदत होते.
सर्व्हिस डॉग आपला तणाव व आजार ओळखून वेळीच सतर्क करू शकतात यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आलेले असते, असे मेडिकल डिटेक्शन डॉग्स या संस्थेच्या सह-संस्थापक आणि मुख्य वैज्ञानिक क्लेअर गेस्ट सांगतात. कुत्रे मानवी तणाव ओळखू शकतात का हे पाहण्यासाठी घेण्यात आलेल्या अभ्यासात ३६ तणावग्रस्त आणि तणावमुक्त सहभागींचे घाम तसेच श्वासाचे नमुने गोळा करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात कुत्र्याला तणावाचा नमुना शोधण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. यात जेव्हा कुत्र्यांना हे नमुने प्रत्यक्ष दाखवण्यात आले तेव्हा त्यांच्याकडून तणावग्रस्त व तणावमुक्त असे विभाजन करून नमुने ओळखण्यात आले. ७२० चाचण्यांपैकी ६७५ मध्ये तणावाचा नमुना या कुत्र्यांनी अचूक निवडल्याने दिसून आले.
Dog How to Identify Stress in Human Being
Science