नवी दिल्ली – पैशांसाठी कोण काय करेन याचा काही नेम नाही. त्यातही सरकारी नोकरीला असलेले तर काहीही करु शकतात, असे म्हटले जाते. चक्क एमबीबीएश डॉक्टर आणि फार्मसिस्टने कोट्यवधीची औषधे विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने याचा शोध लावला आहे. ईएसआय डिस्पेंसरीला दिली जाणारी कोट्यवधींची औषधे फसवणूक करून विकल्याच्या आरोपाखाली एमबीबीएस डॉक्टर, दोन फार्मसिस्टसह एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सूत्रधार एमबीबीएस डॉक्टर अविनाश सैनी (ग्रेटर नोएडा), फार्मसिस्ट चंद्र प्रकाश (३३, फरिदाबाद), फार्मासिस्ट अंकित मिश्रा (२३) आणि दोन औषध खरेदी करणारे ग्राहक प्रवीण मंगला (४०) आणि सुमेश राठी (५२) यांचा समावेश आहे. आरोपी डॉ. अविनाश सैनी, चंद्र प्रकाश यांच्या सांगण्यावरून अनावश्यक महागडी औषधे लिहून देत होते. नंतर ही औषधे रुग्णांना न देता ती डिस्पेंसरीच्या साठ्यातून काढून विकत होते. हे सर्व आरोपी २०१८ पासून औषधे चोरी करत होते. गेल्या तीन वर्षात या आरोपींनी कोट्यवधींची औषधे विक्री केल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने बदरपूर परिसरात चंद्र प्रकाश आणि प्रवीण मंगला यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ईएसआय डिस्पेंसरीमध्ये वापरण्यात येणारी लाखोंची औषधे हस्तगत करण्यात आली. सर्व औषधांवर ईएसआयची मोहोर उमटवलेली होती. चौकशीदरम्यान आरोपी समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. ही सर्व औषधे ईएसआय कार्डधारकांना वितरित करण्यात आलेली होती. काही कार्डधारक डिस्पेंसरीला आलेच नाहीत, परंतु त्यांच्या नावावर औषधे सुरूच होती.
काही प्रकरणांमध्ये डिस्पेंसरीत आलेल्या रुग्णांना आवश्यक नसलेली औषधे लिहून देण्यात आली होती. फार्मासिस्ट यांच्या सांगण्यावरून डॉ. अविनाश रुग्णांना अनावश्यक औषधे लिहून देत होते. आरोपी चंद्र प्रकाशच्या माहितीवरून डॉ. अविनाश, सुमेश राठी आणि अंकित मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे. ओखला येथील डिस्पेंसरीत चंद्र प्रकाश फार्मासिस्ट आहे. अविनाश एमबीबीएस डॉक्टर आहे. अंकित मिश्रा तिगडी येथील डिस्पेंसरीत फार्मासिस्ट आहे.