अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोरोनाच्या काळात संसर्ग टाळण्यासाठी, लसीची नोंदणी, केंद्रे शोधणे आणि प्रमाणपत्रे मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आरोग्य सेतू अॅप आता मोदी सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग बनले आहे. या अॅपच्या मदतीने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनपासून टेस्ट रिपोर्टपर्यंतचा तुमचा सर्व वैद्यकीय डेटा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. कोरोना संसर्गाला दूर ठेवण्यासाठी आवश्यक माहिती देण्यापासून ते लशींची उपलब्धता सांगण्यापर्यंत आरोग्य सेतू अॅप अतिशय महत्त्वाचे ठरले. आता वैद्यकीय दृष्टीकोनातूनही हे अॅप महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी फक्त आरोग्य सेतूला भेट देऊन आयुष्मान भारत आरोग्य खाते उघडावे लागणार आहे. खाते उघडताच, आरोग्य सेतूवर १४ अंकी क्रमांक तयार होईल, ज्याच्या मदतीने सर्व वैद्यकीय डेटा मोबाइल अॅपवर सेव्ह केला जाऊ शकतो.
आरोग्य सेतू आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या एकत्रीकरणाची घोषणा करताना, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे सीईओ आरएस शर्मा म्हणाले की, कोरोना युगात महत्त्वाची भूमिका बजावणारे हे डिजिटल प्लॅटफॉर्म आरोग्य सेवा सुरळीत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत राहील. सध्या आरोग्य सेतूचे २१४ कोटी वापरकर्ते आहेत आणि ते आता सहजपणे त्यांचे आयुष्मान भारत आरोग्य खाते उघडू शकतात. आधार क्रमांक तसेच इतर ओळखपत्राद्वारे खाते उघडता येते. आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, देशातील सर्व आरोग्य सेवा डिजिटल हेल्थ मिशनच्या व्यासपीठाशी जोडण्याचे काम वेगाने केले जात आहे आणि लवकरच चांगल्या आरोग्य सेवा सर्वसामान्यांना डिजिटल स्वरूपात सहज उपलब्ध होतील. याशिवाय, अलीकडेच गृह मंत्रालयाच्या पुढाकाराने केंद्रीय निमलष्करी दलांना आयुष्मान भारत योजनेशी जोडण्यात आले होते. आता केंद्रीय निमलष्करी दलात कार्यरत असलेल्या सर्व जवानांना आयुष्मान कार्ड दिले जात आहे.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आयुष्मान भारत डिजिटल अभियान या त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या योजनेअंतर्गत भारत सरकारच्या आरोग्य सेतू या अत्यंत लोकप्रिय आरोग्यविषयक ॲपचे एकीकरण करण्याची घोषणा केली आहे. या एकीकरणामुळे 14 अंकी विशिष्ट आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक वापरण्याचे लाभ आता आरोग्य सेतू ॲपचे वापरकर्ते आणि त्यापलीकडे अनेकांना घेता येणार आहेत. आयुष्मान भारत डिजिटल अभियानाअंतर्गत, वापरकर्ते त्यांचा विशिष्ट आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक मिळवू शकतो. हा क्रमांक डॉक्टरांची औषधयोजना, प्रयोगशाळेतील तपासण्यांचे अहवाल, रुग्णालयातील नोंदी यांसह त्यांच्या सध्याच्या आणि नव्या आरोग्य विषयक नोंदींशी जोडता येतो आणि या नोंदी नोंदणीकृत आरोग्य व्यावसायिक आणि आरोग्य सेवा पुरवठादारांशी सामायिक करता येतात. तसेच आरोग्यसंबंधी इतिहासाचा सामायिक साठा करतानाच नागरिकांना इतर डिजिटल आरोग्य सेवांचा लाभ देखील घेता येतो.
या एकीकरणाबाबत अधिक तपशीलवार माहिती देताना राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे प्रमुख डॉ.आर.एस.शर्मा म्हणाले: आरोग्य सेतूचे आयुष्मान भारत डिजिटल अभियानासोबत एकत्रीकरण झाल्यामुळे, आपण आता अभियानाचे लाभ आरोग्य सेतू वापरणाऱ्यांना मिळवून देता येतील आणि त्यांची योग्य परवानगी घेऊन त्यांना डिजिटल आरोग्य परिसंस्थेशी जोडून घेता येईल. आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक तयार करणे ही सुरुवात असून आपण लवकरच तुमच्या आरोग्यविषयक डिजिटल नोंदी बघण्याची सुविधा देखील सुरु करू.”
आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक तयार करणे ही अत्यंत सोपी प्रक्रिया आहे. वापरकर्त्याला त्याचा आधार कार्ड क्रमांक आणि नाव, जन्मवर्ष (किंवा जन्मतारीख), लिंग आणि पत्ता (एकदा आधार ओटीपी द्वारे वापरकर्त्याची पडताळणी झाली की पत्ता आपोआप दिसू लागेल) यांसारख्या लोकसंख्याविषयक काही मुलभूत तपशीलांची माहिती वापरून हा क्रमांक मिळवता येईल. जर वापरकर्त्याला आधार क्रमांक वापरायचा नसेल तर वाहन चालविण्याचा परवाना अथवा मोबाईल क्रमांक वापरून देखील आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक मिळविता येईल. वापरकर्त्याला त्याचा आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक https://abdm.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करून किंवा https://play.google.com/store/apps/details?id=in.ndhm.phr या आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक ॲपवरुन मिळवता येईल अथवा आयुष्मान भारत डिजिटल अभियानासोबत एकत्रित करण्यात आलेल्या इतर ॲपचा वापर करून मिळवता येईल. आयुष्मान भारत डिजिटल अभियानाबद्दल अधिक माहिती https://abdm.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.