मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) तयार केलेल्या व्यावसायिक आचारसंहितेमुळे डॉक्टरांच्या मनमानीला चाप लागणार आहे. या आचारसंहितेत रुग्णांना औषधे विक्री करण्यास डॉक्टरांना मनाई केली नसली, तरी ते रुग्णांना महागडे ब्रँडेड औषधे विक्री करू शकणार नाहीत, अशी तरतूद केली आहे.
एनएमसीने नुकताच व्यावसायिक आचारसंहितेचा मसुदा तयार केला आहे. त्यानुसार, डॉक्टर औषधांचे खुले दुकान चालवू शकत नाहीत तसेच वैद्यकीय उपकरणेही विक्री करू शकत नाहीत. डॉक्टर ज्या रुग्णांवर स्वतः उपचार करत आहेत, त्यांना औषधे विक्री करू शकतात. परंतु रुग्णांचे शोषण होणार नाही, हे त्यांना सुनिश्चित करावे लागणार आहे.
स्वातंत्र्यापूर्वी तयार केलेल्या अनेक कायद्यांमध्ये रुग्णांना औषधे देण्याची परवानगी डॉक्टरांना देण्यात आली आहे. त्या काळी औषधांची दुकाने कमी होती. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही याला परवानगी आहे. रुग्णांच्या घरी जाऊन डॉक्टरांना उपचार करणे शक्य व्हावे म्हणून ही तरतूद करण्यात आली आहे. वैद्यकीय दुकाने वाढल्यामुळे शहरात डॉक्टरांकडून स्वतः औषधे विक्री करण्याचा कल कमी झाला आहे. लहान शहरांमध्ये अजूनही डॉक्टर रुग्णांची तपासणी केल्यानंतर औषधे विक्री करतात.
डॉक्टरांकडून रुग्णांना औषध विक्री करण्यास एक गट योग्य मानत नाही. कारण डॉक्टर महागडी ब्रँडेड औषधे बाळगतात आणि ते घेण्यासाठी रुग्णांना भरीस पाडतात. वैद्यकीय दुकानांमधून जेनेरिक औषधे खरेदी करण्याचा पर्याय असतो. एखाद्या आजारावर पाच औषधे असतील आणि डॉक्टरांकडे कमी परिणामकारक औषध असेल, तेव्हा ते आपल्या औषधांची विक्री वाढविण्यासाठी तेच औषध लिहून देतात.
तथापि या निर्णयाच्या बाजूने बोलणारे सांगतात, की उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णांना औषध विक्री केल्यास रुग्णांचा वेळ वाचू शकतो. एनएमसीने मसुद्यात सांगितले, की कोणताही डॉक्टर दुसऱ्या डॉक्टराने लिहिलेले औषध विक्री करू शकत नाही. त्यांनी जेनेरिक औषधेच लिहावीत आणि विक्री करावीत.