कानपूर (उत्तर प्रदेश) – गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगात खूप मोठी उलथापालथ झाली आहे. या महामारीत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला, लाखो नागरिक बरे झाले. काहींच्या नोकर्या गेल्या, काहींचे उद्योग-व्यवसाय बुडाले. या सर्व निराशाजनक वातावरणात अनेकांना नैराश्यही आले. कोरोनाच्या भीतीने अनेकांनी आत्महत्या केल्याचेही आढळून आले. कोरोनाचे हे निराशाजनक वातावरण निवळू लागल्यानंतर आता कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. हा व्हेरिएंट आल्याचे वृत्त ऐकूनच अनेकांनी धसका घेतल्याचे दिसून येत आहे.
येथील कल्याणपूर परिसरातील इंदिरा नगर येथील डिव्हीनिटी अपार्टमेंटमध्ये एका डॉक्टरने आपल्या कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर फरारी झाल्यानंतर त्याने याबद्दल भावाला माहिती देऊन पोलिसांना घटनेची माहिती देण्यास सांगितले. पोलिसांच्या उपस्थितीत घराचा दरवाजा तोडल्यानंतर वेगवेगळ्या खोल्यांमध्ये मृतदेह आढळले. आयुक्तांसह पोलिस पथक आणि न्यायवैद्यक पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून दहा पानांचे एक पत्र मिळाले आहे. नैराश्य आल्याने आरोपीने हे कृत्य केल्याची कबुली पत्रात दिली आहे.
अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर राहणारा आरोपी डॉ. सुशील कुमार (वय ५०) रायबरेली जिल्ह्यातील उसरूमधील रहिवासी आहे. तो मंधना येथील रामा वैद्यकीय महाविद्यालयात कायदेविषयक वैद्यक विभागाचा अध्यक्ष आहे. पत्नी चंद्रप्रभा या शिवराजपूर येथील प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. त्यांचा २१ वर्षीय मुलगा शिखर हा दिल्लीतील इंस्टिट्यूटमध्ये अभियांत्रिकीची तयारी करत होता. १६ वर्षीय मुलगी खुशी ही वु़डबाइन स्कूलमध्ये विद्यार्थी होती.
सायंकाळी सुशीलने हातोड्याने वार करून पत्नी, मुलगा आणि मुलीचा गळा घोटून खून केला. मोबाईवर आलेल्या मेसेजनंतर त्याच्या मोठ्या भावाने पोलिसांना माहिती दिली. आरोपीच्या भावासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. न्यायवैद्यक पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. श्वान पथकाचा श्वान पायर्यांवरून खाली उतरला. खाली लॉनपर्यंत गेल्यानंतर तिथेच थांबला. तिथे थोड्यावेळ फिरल्यानंतर पुन्हा वर गेला.
यापूर्वीही हत्येचा प्रयत्न
आरोपीच्या मोठ्या भावांनी सांगितले, की नैराश्य आलेल्या सुशीलवर उपचार सुरू होते. तो खूप लवकर निराश होत होता. कोरोना काळात डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सुशीलला खूप काळजी वाटली होती. आता कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने तो पुन्हा काळजीत पडला होता. सहा महिन्यांपूर्वी आणि दोन दिवसांपूर्वी त्याने पत्नीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला होता. पत्नीची हत्या करावी वाटते असे तो नेहमीच बोलायचा.