अक्षय कोठावदे, पिंपळनेर
हीच आमची मागणी,हेच आमचे मागणे ,माणसाने माणसाशी माणसासम वागणे. या उक्ति प्रमाणे आपलं आयुष्य जगत स्वतःच ध्येय आणि नीतिमत्ता या दोन्ही गोष्टिंचा समतोल राखून,ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रात अनेकांच्या जीवनज्योती प्रकाशित करण्याचं काम केलं ते दुसरे तिसरे कोणी नसून डॉक्टर मनोहर शिंदे होय.
डॉ. मनोहर शिंदे हे नाशिक येथील श्री गुरुजी रुग्णालय येथे कार्यरत असतांना त्यांना, त्यांचे मूळ गाव सामोड़े व आसपासच्या परिसरातील अनेक नागरिकांचे फोन येऊ लागले, परिस्थिती फार गंभीर होती अशा परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता ते श्री गुरुजी रुग्णालय येथून एक महिन्याची सक्तीची रजा घेऊन आपल्या गावी आले आणि कोरोना रुग्णांच्या सेवेला सुरूवात केली. शिवदुर्ग प्रतिष्ठान व भारत माता रुग्ण सेवासमिती,पिंपळनेर यांच्या माध्यमातून भाडणे येथील शासकीय कोव्हिड सेंटर येथे तब्बल वीस दिवस निस्वार्थ सेवा दिली.
डॅाक्टर शिंदे यांनी कोरोनाच्या काळात सेवा देतांना आलेल्या अनुभवावर आधारीत SOP तयार केली आणि ती SOP सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र प्रसारित करण्याचे आवाहन केले. जेणेकरून या माहितीच्या माध्यमातून कोरोना रुग्णांची सेवा करण्यास मदत होईल.त्या SOP चा परिसरातील नागरिकांना व डॉक्टरांना खूप फायदा झाला.
सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर मनोहर शिंदे यांनी आपल्या संकल्पनेतून स्वतः पुढाकार घेऊन पिंपळनेर येथे सहकाऱ्यांच्या मदतीने भारत माता रुग्ण सेवा समितीची स्थापना केली, या समितीच्या माध्यमातून पिंपळनेर परिसरातील कोरोना रुग्णांची नुसती सेवाच नव्हे तर मृत पावलेले कोरोना रुग्णांचा अंत्यविधी, खांदा देणे व अशी अनोखी सामाजिक सेवा, भारत माता रुग्ण सेवा समितीच्या माध्यमातून करण्यात आली. डॉक्टर मनोहर शिंदे हे सध्या ३ वर्षा पासून नाशिक येथील श्री गुरुजी रुग्णालय येथे हृदयरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर शिंदे यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९७२ साली साक्री तालुक्यातील सामोडे या गावी झाला.
अशाप्रकारे निर्माण झाली डॉक्टर होण्याची जिद्द
– डॉक्टर शिंदे बारावीला शिकत असताना त्यांचा हात मोडला आणि ते उपचारासाठी धुळे येथील अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सैंदाणे यांच्याकडे गेले त्या ठिकाणी डॉक्टर शिंदे यांनी तब्बल तीन तास उपचारासाठी वाट पाहिली त्यावेळेस त्यांनी आपल्या मनात जिद्द निर्माण केली की, मी होणार तर डॉक्टरचा होणार किंवा शेती करणार.
येथून सुरु झाला डॉक्टर शिंदे अत्यंत संघर्षमय प्रवास
आपला हात मोडल्यानंतर डॉक्टर शिंदे यांनी त्यावर्षी गॅप घेतला आणि पुन्हा जोमाने अभ्यास करून बारावीत ९१ टक्के मिळवून उत्तीर्ण झाले, त्यानंतर डॉक्टर शिंदे यांनी शासकीय कोट्यातून MBBS या वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला, डॉक्टर शिंदे यांना MBBS या शिक्षणासाठी प्रवेश घ्यायला बऱ्याच अडचणी आल्या तरीसुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची हिम्मत न खचता MBBS चे शिक्षण पुर्ण केले. पुढील पदवीत्तर शिक्षणासाठी थेट हायकोर्टा पर्यंत जाऊन त्यानी १९९८ साली MD Medicine साठी पुणे येथील ससून रूग्णालयात आपला प्रवेश निश्चित केला. त्याआधी सन १९९५ ते 1१९९६ या काळात साक्री तालुक्यातील जैताने येथील ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले, यादरम्यान डॉक्टर शिंदे यांनी वैद्यकीय सेवेसह सामाजिक कार्यात देखील आपला ठसा उमटवला, अजुनसुध्दा माळमाथा जैताणे परीसरात त्यांनी केलेल्या कामाच्या आठवणी सांगीतल्या जातात. त्यानंतर पुणे येथील बीजे मेडिकल कॉलेज मधून 2001 साली त्यांनी MD मेडीसीन पुर्ण केले. त्यानंतर DNB (cardiology) चे शिक्षण भारतातील दिल्ली येथील सुप्रसिद्ध Escort Heart Hospital येथे पुर्ण केले व २००२ ते २०१० एकूण ८ वर्ष कामाचा अनुभव घेतला. त्यानंतर आंध्र प्रदेशातील पुटटपर्ती येथील सत्यसाईबाबा रुग्णालय येथे २०१० ते २०१४ दरम्यान एकूण साडेचार वर्ष येथे ही आपली निस्वार्थ सेवा दिली. २०१५ मध्ये एक वर्ष औरंगाबाद येथील डॉक्टर हेडगेवार रुग्णालय येथेदेखील सेवा दिली. शिर्डी येथील साईबाबा संस्थान यांच्या रुग्णालयात २०१५ ते २०१८ मध्ये निस्वार्थ सेवा दिली.
*कोरोना रुग्णांची सेवा करताना डॉक्टर शिंदे यांनी जपला माणुसकीचा धर्म*
साक्री तालुक्यातील कोकले येथील माजी सरपंच यांचे वयवर्ष ९० असलेले वडील त्यांची प्रकृति चिंताजनक होती आणि त्याचवेळी परिसरातील एक कोरोना बाधित महिला आली (वय ३४) त्या महिलेची प्रकृती खूपच चिंताजनक होती, आणि त्या महिलेला तात्काळ बेड हवा होता,बेड एकच शिल्लक होता९० वर्षीय रुग्णाच्या नातेवाईकांशी चर्चा करून व समजूत घालून त्या ३४ वर्ष महिलेला मिळवून दिला व ती बरी झाली.या घटनेट डॉक्टर शिंदे यांचा खारीचा वाटा होता.
डॉक्टर शिंदे हे सुप्रसिद्ध अभिनेते अभिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन, माजी केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार,भारतरत्न नानाजी देशमुख, आ.अशोक सिंघल यांचे देखील वैयक्तिक डॉक्टर होते.
डॉक्टर आनंद पाठक यांच्या सहवासातून निर्माण झाली संघाची गोडी.
– साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पिंपळनेर जवळील वार्सा येथील वनवासी कल्याण आश्रमचे डॉ.आनंद पाठक यांच्या १९९२ पासूनच्या मैत्री व संपर्कामुळे सामाजिक कार्याची गोडी निर्माण झाली, त्याच प्रकारे डॉक्टर पाठक यांच्या सहवासात राहून बऱ्याच गोष्टी डॉक्टर शिंदे यांना शिकायला मिळाल्या. डॉक्टर शिंदे यांचे आज पर्यंत कुठेही वैयक्तिक रुग्णालय नाही, शिक्क्षणानंतर त्यांनी सदैव सामाजिक संस्थामध्ये सेवा दिली आहे.त्याचप्रमाणे डॉक्टर शिंदे हे सर्वसामान्यांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतात, कमीतकमी खर्चात आपली निस्वार्थ सेवा देतात. अशा या डॅा. शिंदे यांनी डॉक्टर दिनानिमित्त सर्वसामान्यांना आवाहन करतांना सांगितले की, सर्वसामान्यांनी प्रधानमंत्री जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून गंभीर आजारांवरील उपचार करावे.
हेच माझे ध्येय