लातूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप नेहमीच होतो. पण, तक्रार देऊनही पुढे काहीच होत नाही. मात्र, लातूरच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. डॉक्टर दाम्पत्याच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या उपचार पद्धतीमुळे एका 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. प्रकरणाची सुनावणी करीत ग्राहक तक्रार निवारण आयोगाने डॉक्टर दाम्पत्याला तब्बल 40 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अवघ्या ११महिने 28 दिवसात आयोगाने प्रकरणाचा निकाल दिला.
लातूर जिल्ह्यातील नणंद या गावातील रेवती गावकरे ही 27 वर्षीय महिला मागील वर्षी घरकाम करताना पडली होती. त्यांच्या हाडाला मार लागला होता. उपचारासाठी त्यांना लातूर इथल्या डॉ. विक्रम सूर्यवंशी आणि डॉ. श्वेता सूर्यवंशी यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण, त्यानंतर शुद्धीवरच आल्या नाहीत. डॉक्टर दाम्पत्याने नातेवाईकांना माहिती न देता परस्पर दुसऱ्या रुग्णालयात हलवले. तिथे रुग्णाला मृत घोषित करण्यात आले होते.
मृत रेवती यांना दोन लहान मुले आहेत. किल्लारी येथील खाजगी दुकानावर त्या काम करायच्या. त्या बदल्यात महिना नऊ हजारांचा मोबदला मिळायचा. दोन्ही लहान मुलांना घेऊन त्या वडिलांकडे राहत होत्या. अचानकपणे मुलगी दगावली आणि दोन नातू सांभाळण्याची जबाबदारी आजोबा मोहन पाटील यांच्यावर आली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रेवती गावकरे यांचा मृत्यू झाला असा आरोप वडिलांनी केला. अखेर डॉक्टरांच्या हलगर्जीपणाच्या विरोधात रुग्ण हक्क समितीच्या सहकार्याने त्यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगात डॉक्टर दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली.
रेवती यांच्या मृत्यूसाठी डॉक्टर दाम्पत्याला जबाबदार ठरवित दणका दिला. रुग्ण हक्क समिती म्हणते चित्र बदलेल डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होतो, अशी ओरड सातत्याने होत असते. मात्र रुग्णांचे नातेवाईक कायदेशीर लढाईच्या प्रक्रियेला सामोरे जात नाहीत. या निकालानंतर चित्र बदलेल असा विश्वास रुग्ण हक्क समिती सदस्यांनी व्यक्त केला.
Doctor Couple 40 Lakh Rupees Fine Negligence