नाशिक – नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर स्वप्नील शिंदे या शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यु झाला आहे. तो गायनॅकॉलॉजीच्या दुसर्या वर्षात शिक्षण घेत होता. याप्रकरणी दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. रॅगिंग प्रकरणातून स्वप्नीलचा घातपात झाला असून त्याच्याकडे आढळून आलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याने रॅगिंग करणार्यांची नावेही दिली आहे. पोलीस याबाबत तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही कुटुंबियांनी केला आहे. तर कॉलेज प्रशासनाकडून या आरोपाचे खंडन केले आहे.
या घटनेबाबत प्राचार्या डॅा. मृणाल पाटील यांनी सांगितले की, मयत झालेल्या विद्यार्थी डॉक्टरवर मानसोपचार सुरू होते. रॅगिंग होत असल्याबाबतची कोणीतीही तक्रार नव्हती. याप्रकरणी यापूर्वीही त्याच्या पालकांना बोलावण्यात आले होते. फेब्रुवारीपासून तो बीड येथील त्याच्या घरी होता. जूनमध्ये तो कॉलेजला परतल्यानंतर त्याच्या आईला त्याच्यासोबत राहण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याची आई त्याच्यासोबत येथेच राहत होती, मात्र त्यांनीही आपल्याकडे कोणतीही तक्रार केली नसल्याचे प्राचार्या डॅा. मृणाल पाटील यांनी सांगितले.