नवी दिल्ली – देशात, २०२१ पर्यंत, ‘एक हजार माणसांसाठी एक डॉक्टर’ या जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या लोकसंख्या-डॉक्टर गुणोत्तराचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर, यशस्वीपणे वाटचाल करतो आहे, तसेच देशातील एकूण खाटांची संख्या ११ लाखांवरुन २२ लाखांपर्यंत वाढवण्याचे काम देखील सुरु आहे, अशी माहिती नीती आयोगाचे आरोग्य सदस्य, डॉ विनोद पॉल यांनी एका व्याख्यानमालेत दिली.
“गेल्या ७५ वर्षात, भारताने आरोग्य क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी, सरासरी आयुर्मान केवळ २९ इतके होते, आता मात्र ते जवळपास ७० वर्षांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, आजही आपण आरोग्य सेवांच्या बाबतीत लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात पूर्णतः यशस्वी झालो नाहीत. हे एक मोठे आव्हान आपल्यासमोर आजही आहे. गेल्या सहा-सात वर्षात आपण या समस्या सोडवण्यासाठी, अनेक पावले उचलली आहेत आणि त्याचे परिणाम अत्यंत उत्साहवर्धक आहेत” असे पॉल यांनी यावेळी सांगितले. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या न्यू इंडिया @75 या ऑनलाईन व्याख्यानमालेत ते आज बोलत होते. राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संवाद आणि विज्ञान प्रसारविषयक राष्ट्रीय परिषदेने ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे.
आयुष्मान भारत योजना आणि जन आरोग्य योजना, हे दोन्ही कार्यक्रम, सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधांवर भर देणारे आहेत तसेच देशात सार्वजनिक आरोग्य क्षेत्राची व्याप्ती वाढवणे, या सुविधा सर्वांना कमी दरात उपलब्ध करुन देणे आणि आरोग्य सुविधा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी या योजना कार्यरत आहेत,” असे त्यांनी पुढे सांगितले. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव, प्रा आशुतोष शर्मा यांनी यावेळी, देशाच्या विकास आणि प्रगतीत, गेल्या ५० वर्षात, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या योगदानाची माहिती दिली. तसेच भारताला विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष शक्ति बनवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली.