सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री मध्ये प्रत्येक कलाकार त्याच्या नावाने ओळखला जातो. काही जण टोपण नावाने ख्यात आहेत. मात्र, असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांचे मूळ नाव बदलले आहे. तर, असे काही कलाकार आहेत ज्यांनी आपल्या संपूर्ण नावाचा कधीही उल्लेखच केला नाही. आपले आडनाव न वापरताच ते प्रसिद्ध झाले. अशाच काही ख्यातनाम व्यक्तींची खरी नावे आपण आज जाणून घेणार आहोत. चला वेळ न दवडता आता आपण ही नावे पाहूया….
श्रीदेवी
बॉलीवूडमध्ये चाँदनी या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. तिचे पूर्ण नाव फार कमी चाहत्यांना माहित आहे. श्रीदेवीचे पूर्ण नाव आहे श्रीम्मा यंगर अय्यपन. मात्र, खडतर आणि मोठे नाव असल्याने तिनी स्वतःसाठी फक्त श्रीदेवी या नावाची निवड केली. आणि हेच नाव कोट्यवधी चाहत्यांच्या मुखी आहे.
गोविंदा
बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदाचे संपूर्ण नाव गोविंद अरुण अहुजा आहे. त्याचे चाहते त्याला गोविंदा या नावानेच ओळखतात. आडनाव मोठे असल्यानेच गोविंदाने ते काढून टाकले होते.
रेखा
बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा तिच्या सौंदर्य आणि दमदार अभिनयामुळे आजही चाहत्यांची आवडती अभिनेत्री आहे. प्रत्येकजण अभिनेत्रीला फक्त रेखा या नावाने ओळखतो, परंतु रेखाचे पूर्ण नाव आहे भानूरेखा गणेशन. हे फार क्वचित जणांनाच माहिती आहे. मिडिया रिपोर्ट नुसार, रेखाच्या वडिलांनी तिला कधीही त्यांचे नाव दिले नाही. म्हणून रेखाने तिच्या वडिलांचे जेमिनी गणेशन हे आडनाव कधीही वापरले नाही.
जितेंद्र
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात. जितेंद्र यांनी फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच आपल्या नावातून आडनाव वगळले होते. जितेंद्र यांचे पूर्ण नाव रवी कपूर असे होते.
हेलन
पूर्वीच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हेलन यांचे पूर्ण नाव हेलन एन्न रिचर्डसन आहे. आडनाव फार मोठे असल्यामुळेच त्यांनी कधीही आडनाव वापरले नाही. हेलन या सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानची सावत्र आई आहे.