मुंबई – सूर्याभोवती प्रदक्षिणा करणारी पृथ्वी ३६५ दिवस केव्हा पूर्ण करते, ते आपल्याला काय जगालाही कळत नाही ! इतके भरभर दिवस पुढे सरकत राहतात, बघता बघता सुमारे ३५८ दिवस गेले, १२ महिनेही संपत आले आणि वर्ष देखील संपायला आले, आता सर्वांना नव्या वर्षाची आस लागलेली आहे. नव्या वर्षात सर्वजण नवीन संकल्प करतील ते पूर्ण होतीलच असे नाही. परंतु या सर्व धावपळीत आणि दैनंदिन कामकाजाच्या गडबडीत महत्त्वाची कामे मात्र राहून जातात, आज करू उद्या करू असे म्हणता म्हणता, काही कामे अगदी तोंडाजवळ आल्यावर पूर्ण करावी लागतात. त्यामुळे काही महत्त्वाची राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक असते. त्यासाठी आता केवळ ७ दिवस राहिले आहेत कोणती आहे ती महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्या. म्हणजे आपल्याला अडचण होणार नाही किंवा नुकसान होणार नाही.
आयकर रिटर्न अजून भरले नसेल, तर ते लवकर सबमिट करा. त्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. त्यानंतर आपल्याला दंड भरावा लागू शकतो. आयटी रिटर्नसह इतर चार महत्त्वाची कामे आहेत, ज्यांची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे, अशी कामे लवकर पूर्ण करण्यासाठी अवघे ७ दिवस उरलेले आहेत.
आयटी रिटर्न्स
नवीन आयकर पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे आणि कोरोना विषाणूमुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख आधीच दोनदा वाढवण्यात आली आहे. आयकर विभागाने तिसऱ्यांदा दि. ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शेवटच्या तारखेपर्यंत थांबू नका आणि लवकरात लवकर विवरणपत्र सादर करा, असा सल्ला विभागाने दिला आहे. त्यानंतर सबमिशन केल्यास दंड आकारला जाईल.
पीएफ खाते आधारशी लिंक
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खाते आधार कार्डशी लिंक करण्याची आणि नॉमिनीचे नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. ईपीएफ खाते (यूएएन) आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. खातेदारांनी तसे न केल्यास त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
पेन्शनसाठी जीवन प्रमाणपत्र
सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांना वर्षातून एकदा दि. ३० नोव्हेंबरपूर्वी हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. यंदा त्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. शेवटच्या तारखेपर्यंत प्रमाणपत्र सादर न केल्यास, पेन्शन थांबविली जाऊ शकते.
डीमॅट-ट्रेडिंग खात्यासाठी केवायसी
सेबीने डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांचे केवायसी करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर नंतर आता ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवली आहे. केवायसी अंतर्गत नाव, पत्ता, पॅन कार्ड क्रमांक, वर्तमान मोबाइल क्रमांक, वय, योग्य ईमेल आयडी यासारखी माहिती अपडेट करावी लागेल. केवायसी (KYC ) करण्यात अयशस्वी झाल्यास खाते बंद केले जाऊ शकते.