नवी दिल्ली – देशात आवश्यक काळजी घेतली गेल्यास आपण कोरोना महामारीच्या तिस-या लाटेला रोखू शकतो, असे केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी म्हटले आहे. आवश्यक काळजी घेतल्यास आणि सरकारने सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनांने पालन केल्यास काही ठिकाणीच तिसरी लाट येऊ शकेल किंवा कधीच येणार नाही, असे त्यांनी सांगितले. देशात कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर स्पष्टीकरण देताना राघवन म्हणाले की, जर आवश्यक काळजी घेतली तर कोरोनाची तिसरी लाट प्रत्येक ठिकाणी येणार नाही.
तिस-या लाटेला रोखणे अवघड नाही
आपण मार्गदर्शक सूचनांचे कशा प्रकारे पालन करतो यावर तिसरी लाट येणार की नाही हे अवलंबून आहे. व्यक्तिगत पातळीवर, स्थानिक, राज्य पातळीवर आणि सर्वच ठिकाणी योग्य ती काळजी आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यास तिस-या लाटेला रोखू शकतो. हे बोलायला आणि ऐकायला अवघड वाटत असले तरी शक्य आहे. प्रतिबंधित क्षेत्रे, टेस्टिंग, ट्रिटमेंटबाबतच्या सूचनांचे पालन केल्यास कोरोनाला रोखणे अवघड नाही, असे राघवन म्हणाले.
कोरोनाला संधीच देऊ नये
संपूर्ण जगभरात आणि भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेळेत कोरोनाचा ज्वर वाढला आहे. कोरोनाचा संसर्ग कधी आणि केव्हा वाढतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. कोरोना विषाणूला संधी मिळाली की तो फैलावतो. त्याला जर प्रसार होण्याची संधीच दिली नाही, तर तो संसर्ग करू शकणार नाही, असे त्यांनी सांगितले.
जास्तीत जास्त काळजी घ्यावी
ज्या लोकांनी लस घेतली आहे, जे मास्क वापरतात, पूर्ण काळजी घेतात ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. पण विषाणूला जास्त संधी दिल्यास रुग्णसंख्या वाढणार आहे. आधी काळजी घेणारे लोक नंतर निष्काळजी झाले, असेही होऊ शकते. त्यामुळे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. संसर्ग झालेले लोक ज्यांना लक्षणे दिसत नाहीत, ते इतरांना जास्त संसर्ग करू शकतात. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.