नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अख्खे वर्ष एका बाजुला आणि मार्च महिना एका बाजुला अशी स्थिती असते. कारण आर्थिक गुंतवणुक, करबचत, अर्थ विभागाशी संबंधित सरकारी नियमांचे पालन करणे आदींसाठी हा महिना अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. आणि त्याची मुदत असते ३१ मार्च. आता केवळ तीन आठवड्यांचा अवधी शिल्लक राहिलेला असल्यामुळे काही गोष्टी तातडीने करणे आवश्यक आहे.
चालू आर्थिक वर्षाचा हा शेवटचा महिना आहे. या महिन्यात आवश्यक असलेली कामे वेळेत पूर्ण केली नाही तर मोठ्या आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागतो. त्यातील सर्वांत महत्त्वाचं काम म्हणजे आधार आणि पॅनकार्ड जोडणे. सरकारने अनेकदा यासाठी मुदतवाढ दिली. परंतु, आता ३१ मार्च २०२३ पर्यंत हे काम कुठल्याही परिस्थितीत करावेच लागणार आहे. कारण ३० जून २०२२ पासून या कामासाठी १ हजार रुपये दंड सरकारने तसाही लागू केलेला आहे.
३१ मार्चनंतर दंड वसूल होणार नाही आणि आधार-पॅन जोडलेही जाणार नाही. याच महिन्यात कर वाचविण्यासाठी आवश्यक असलेली गुंतवणुक करणेही आवश्यक आहे. चालू आर्थिक वर्षात करबचत करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. त्यासाठी पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, ईएलएसएस, जीवन विमा आदींमध्ये गुंतवणुक करून ८० सी अंतर्गत कर बचत करता येणार आहे.
पीएम वय वंदना योजना
ज्येष्ठ नागरिकांना पीएम वय वंदना योजनेत गुंतवणुक करण्यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरच्या मुदतवाढीची कुठलीही अधिसूचना सरकारने काढलेली नाही. त्यामुळे आता हे करावेच लागणार आहे. ६० वर्षांवरील नागरिकांसाठी ही पेन्शन योजना आहे.
म्युच्युअल फंडात हे करा
अनेक लोक म्युच्युअल फंडात गुंतवणुक करतात. पण केवळ गुंतवणुक करून होत नाही. त्यासाठी म्युच्युअल फंड पोर्टफोलियोमध्ये नामांकनही करावे लागते. अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. त्यासाठी सर्व फंड हाऊसेसने ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर खाते गोठविले जाऊ शकतात.
Do These Work Upto 31 March 2023