मुंबई – आपल्या जीवनात कोणतीही कामे वेळच्या वेळी केली तर त्याचा मोठा फायदा असतो. दैनंदिन कामाबरोबरच आपली कार्यालयीन कामे असो की, शासकीय पातळीवरील कागदपत्रे जमा करण्याची कामे असोत. वेळच्यावेळी पूर्ण केल्यास त्याचा लाभ होतो. तसेच ऐन वेळी धावपळ होत नाही. तसेच पुढील काळात याबाबत कोणतीही अडचण निर्माण होत नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या महिन्यात आवश्यक अशी ३ कामे करणे प्रत्येकालाच गरजेचे ठरणार आहे.
आपल्या सर्वांकरिताच नोहेंबरचा अखेरचा दिवस महत्वाचा ठरणारा आहे, कारण या महिन्यात काही संबंधित महत्वाची कामे पूर्ण करावी लागतील. निवृत्तीवेतन धारकांसाठी नोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा आहे. कारण त्यांना या काळात त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. कोणत्याही कारणास्तव असे करण्यात अयशस्वी झाल्यास त्यांचे पेन्शन बंद केले जाऊ शकते. याशिवाय नोव्हेंबर महिन्यात आणखी काही महत्त्वाची कामे आहेत, जी वेळेत पूर्ण केल्यास नुकसान सहन करावे लागणार नाही. कोणती आहेत ही ३ कामे ती जाणून घेऊ या…
जीवन प्रमाणपत्र
पेन्शनधारकांना त्यांचे निवृत्ती वेतन कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळत राहण्यासाठी दरवर्षी दि. ३० नोव्हेंबरपर्यंत त्यांचे हयातीचा दाखला तथा जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. काही कारणास्तव निवृत्ती वेतनधारकांना असे करणे शक्य झाले नाही, तर त्यांचे पेन्शन थांबू शकते, ज्यामुळे त्यांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पेन्शनधारक बँकेच्या शाखेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. जीवन प्रमाणपत्र सादर केल्यावर पेन्शनधारक जिवंत आहे की नाही हे दिसून येते. त्यामुळे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांना पुढील निवृत्ती वेतन दिले जाते.
नवोदय विद्यालय प्रवेश
जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता ९ वीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. प्रवेश मिळविण्यासाठी, निवड चाचणी दि. ३० एप्रिल २०२२ रोजी घेतली जाईल. त्यामुळे दि. ३० नोव्हेंबरपर्यंत नवोदय विद्यालय समितीच्या वेबसाइटवर (https://navodaya.gov.in) भेट देऊन ऑनलाइन अर्ज करता येतील. आपल्या पाल्याला जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी लगेच नोंदणी करावी लागेल.
गृहकर्ज
आपल्याला एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये गृहकर्जासाठी अर्ज करायचा असेल तर दि. ३० नोव्हेंबरपूर्वी अर्ज केल्यास तुम्हाला लाभ मिळू शकतो. एलआयसी हाउसिंग फायनान्सने २ कोटी रुपयांपर्यंतच्या गृहकर्जासाठीचा दर ६.६६ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे आणि ही ऑफर फक्त दि. ३० नोव्हेंबरपर्यंत घेतलेल्या गृहकर्जांवर लागू होईल. यानंतर कंपनी व्याजदरात वाढ होऊ शकते. ६.६६ हा सर्वात कमी गृहकर्ज दर आहे. गृहकर्जासाठी अर्ज करायचा असेल तर हे काम लगेच पूर्ण करावे लागेल.