इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – असे म्हणतात की, न्यायदेवता आंधळी असली तरी प्रत्येकाला भारतीय राज्यघटनेनुसार योग्य न्याय मिळतोच. त्यामुळेच भारतीय जनतेचा न्यायव्यवस्थेवर अद्यापही दृढ विश्वास आहे, असे दिसून येते. उत्तर प्रदेशात एका महिलेवर सुमारे 28 वर्षापूर्वी ती लहान असताना बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर आता अनेक वर्षांनी तिने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून तिला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. लखनऊच्या इंद्रनगर भागातील एका महिलेने मुख्य न्यायदंडाधिकार्यांच्या आदेशानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
यावेळी महिलेने सांगितले की, 1994 मध्ये जेव्हा ती 13 वर्षांची होती. तेव्हा ती सदर परिसरात राहणाऱ्या बहिण आणि मेहुण्यासोबत राहायची. तिचे मेहूणे खासगी नोकरी करायचे तर बहीण शाळेत शिकवायची. त्यावेळी ती घरी एकटी असताना एक ट्रकचालक आणि त्याचा भाऊ, अनेकदा घरी यायचे. 1994 ते 1995 या काळात दोघांनी तिला धमकावून अनेकवेळा बलात्कार केला, त्यामुळे ती गर्भवती राहिली. ही बाब तिच्या नातेवाइकांना समजताच त्यांनी आरोपीच्या घरी जाऊन तक्रार केली, मात्र त्यांनी तेथून पळ काढला.
नातेवाईकांनी गर्भपातासाठी तिला डॉक्टरांकडे नेले, परंतु लहान वयामुळे तिच्या जीवाला धोका असल्याचे कारण देत डॉक्टरांनी तसे कसण्यास नकार दिला. दरम्यान, बहीणीची रामपूरला बदली झाली. तीही त्याच्यासोबत तिथे गेली. जिथे तिच्या बाळाचा जन्म झाला. त्यानंतर तिने नातेवाईकांच्या दबावाखाली हरदोई जिल्ह्यातील एका दाम्पत्याकडे आपल्या मुलाला दत्तक दिले.
दरम्यान, सन 2000 मध्ये गाझीपूर जिल्ह्यात या पिडीत मुलीचे लग्न झाले. मात्र काही काळानंतर तिच्या पतीला पूर्वी घडलेली ही बलात्कार ची घटना कळली, त्यावरून तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर ती लखनऊला आली आणि आई-वडिलांसोबत राहू लागली. दरम्यान तिचा दत्तक दिलेला मुलगाही मोठा झाला. तेव्हा त्याला कळले की, तो ज्यांना त्याचे पालक मानतो ते त्याचे खरे पालक नाहीत. त्याच्याकडे अधिक विचारणा केली असता त्यांनी त्याच्या खऱ्या आईबद्दल सांगितले.
त्यानंतर मुलगा लखनऊमध्ये तिच्याकडे आला. अधिक विचारल्यावर तिने संपूर्ण हकीकत मुलाला सांगितली. त्यावर त्याने आरोपींविरुद्ध अहवाल दाखल करण्यास सांगितले. सदर महिलेने सदर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली, मात्र प्रकरण इतके वर्ष जुने असल्याने पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही. त्यावर महिलेने मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज केला. अखेर त्यांच्या आदेशानुसार दोन्ही आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र, तेव्हाचे दोन्ही आरोपी स्वत:ला निर्दोष सांगत होते. सत्य जाणून घेण्यासाठी पोलिसांनी महिला आणि तिचा मुलगा तसेच ट्रक चालकाचे डीएनए नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले. वर्षभरानंतर ट्रकचालक आणि तरुण यांच्यात डीएनए जुळल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर सदर पोलिसांनी आरोपीच्या शोधात छापा टाकला, मात्र तो फरार झाला. मात्र त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महिला आणि तिच्या मुलालाही पुन्हा निवेदनासाठी बोलावण्यात येणार आहे.