नवी दिल्ली – डिमॅट किंवा ट्रेडिंग खाते असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ज्या खातेधारकांनी त्यांचे केवायसी अपडेट केलेले नसेल त्या खातेधारकांचे डिमॅट खाते बंद होणार आहेत. यासाठी खातेधारकांना ३१ जुलैपर्यंत केवायसी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
गेल्या एप्रिलमध्ये सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (CDSL) आणि नॅशनल सिक्योरिटिज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) तर्फे एक परिपत्रक काढले होते. त्यात ३१ जुलैपासून केवायसी माहिती अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे. गुंतवणूकदारांना केवायसी डिटेलमध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर, पॅन नंबर, ईमेल आयडी आणि मिळकतीबाबत माहिती द्यायची आहे, असे सांगण्यात आले आहे.
कोरोना काळात शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. शेअर बाजाराच्या एनएसईच्या नव्या आकड्यांवरून त्याला दुजोरा मिळाला आहे. एनएसईच्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षादरम्यान चार महिन्यांपेक्षा कमी वेळेत त्यांच्या मंचावर ५० लाखांहून अधिक नव्या गुंतवणूकदारांची नोंदणी झालेली आहे.
वार्षिक २.५ पटीने नव्या गुंतवणूकदारांच्या नोंदणीमध्ये वाढ झाली आहे. एप्रिल-जुलै २०१९ दरम्यान ८.५ लाख नव्या गुंतवणूकदारांची नोंद झाली आहे. एप्रिल-जुलै २०२० मध्ये हा आकडा २० लाख आणि चालू आर्थिक वर्षात २५ जुलैपर्यंत ५१.३ लाखांहून अधिक झाला आहे. यामध्ये उत्तर भारतातील राज्यांमधील ३६ टक्के गुंतवणूकदारांचा समावेश आहे. पश्चिम भारतातील राज्यांमधील ३० टक्के, दक्षिण भारतातील राज्यांमधील २२ टक्के आणि उर्वरित १२ टक्के पूर्व भारतातील राज्यांमधील आहे. नव्या नोंदणीत ५३ टक्के उर्वरित पाच राज्यांच्या बाहेरील आहेत. एनएसईवर एकूण नोंदणी केलेल्या गुंतवणूकदारांची संख्या ४.५ कोटींहून अधिक झाली आहे.