इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लग्नकार्य म्हटले की डीजे हा कानठळ्या बसविणारा आणि हृदयाची धडधड वाढविणारा वाद्य प्रकार अगदी ठरलेला असतो. हा प्रकार जणू काही फॅशनच बनला आहे. परंतु या डीजेमुळे अनेक वेळा अपघातही घडतात. अशीच घटना आता उत्तर प्रदेशात घडली आहे.
काही महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यात डीजेच्या आवाजाने एक भिंत कोसळून मुलगा जखमी झाला होता. तर भोपाळमध्ये डीजेचे लाकडी खोके (मोठमोठे साऊंड बाक्स) वाहनांमधून पडून एका चिमुकल्याचा बळी गेला होता. आता उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे.
डोक्याचे केस अडकले
उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील सैदाबाद गावात एका घरात आनंदाचे वातावरण होते. कुटुंबातील सर्वजण आनंदात नाचत होते, त्याचवेळी घरातील एक मुलगीही नाचू लागली. पण याच दरम्यान एक भयंकर वाईट घटना घडली आहे. डीजेच्या तालावर नाचणाऱ्या एका मुलीचे केस जनरेटरच्या पंख्यामध्ये अडकले आणि त्यानंतर ती मुलगी पंख्याच्या दिशेने ओढली गेली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. त्या मुलींचे डोकेच जनरेटर मध्ये अडकले
प्रकृती गंभीर
या दुर्घटनेत मुलीचे केस जनरेटरमध्ये अडकल्याने तिच्या त्वचेला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच शरीरातून रक्तस्त्राव सुरू झाला. मुलीच्या डोक्यावर तब्बल ७०० टाके घालण्यात आले. तिची प्रकृती सध्या ठीक असून आता ती शुद्धीवर आली आहे. घरात आनंदाच्या क्षणी, जेव्हा सर्व नातेवाईक आणि मुलगी डीजेच्या तालावर नाचत होते. पण एका छोट्याशा चुकीमुळे तिचे केस जनरेटरच्या पंखात अडकले. त्याच वेळी ती बेशुद्ध झाली. ती शुद्धीवर आली तेव्हा ती थेट रुग्णालयात होती आणि तिची प्रकृती गंभीर होती.
मोठ्या बहिणीचे लग्न
मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने तिला गावातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मुलीच्या मोठ्या बहिणीचे लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले असून आता घरातील वातावरण थोडे गंभीर बनले आहे. डोक्यावरील त्वचा गेल्यामुळे स्थिती गंभीर आहे. जखम बरी झाल्यानंतरच तिच्या डोक्यावर केस पुन्हा येतील की नाही हे काही महिन्यांनंतरच हे कळेल, असे डॉक्टरांनी सांगितले. विशेष म्हणजे गरिबीमुळे मुलीचे सीटी स्कॅन अद्याप झालेले नाही. मुलीच्या उपचारासाठी वडिलांना पैशांची गरज असून मुलीचे लग्नही तोंडावर आले आहे. अशा परिस्थितीत काही हात मदतीसाठी पुढे आले आहेत, तेवढी एक हीच चांगली गोष्ट म्हणता येईल.
DJ Sound System Girl head 700 stiches