इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp भारतात अचानक बंद झाले आहे आणि त्याच्या सेवा प्रभावित झाल्यामुळे अनेक वापरकर्ते नाराज झाले आहेत. दिवाळी सणाच्या दुसऱ्या दिवशी अचानक अनेक युजर्सना मेसेज पाठवता येत नाहीत आणि काहींना अकाऊंट लॉग इन करता नाही, अशा अडचणी येत आहेत. कंपनी शक्य तितक्या लवकर या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, तब्बल २ तासांनी व्हॉटसअॅपची सेवा पूर्ववत झाली आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास बंद झालेले व्हॉटसअॅप दुपारी अडीचच्या सुमारास सुरू झाले.
वेबसाइट्स किंवा सेवांची माहिती देणारे आणि त्यांचा मागोवा घेणारे प्लॅटफॉर्म डाऊन डिटेक्टरवरील २० हजाराहून अधिक वापरकर्त्यांनी WhatsApp मधील समस्या नोंदवल्या आहेत आणि मोठ्या क्षेत्रातील सध्याच्या त्रुटीमुळे वापरकर्त्यांवर परिणाम झाला आहे. वापरकर्त्यांना मेसेजिंग, सर्व्हर कनेक्शन आणि अॅपच्या इतर भागांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत.
व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याने युजर्स ट्विटर आणि फेसबुक या मायक्रोब्लॉगिंग साइटवर याबद्दल लिहित आहेत. व्हॉट्सअॅपच्या सेवांवर खरोखरच परिणाम झाला आहे का, असे युजर्स एकमेकांना विचारत आहेत. मेटा फॅमिलीच्या अॅप्समध्ये (व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम) अशा समस्या क्वचितच दिसतात, परंतु सध्या व्हॉट्सअॅप चॅटिंग होत नाही. ट्विटरवर #WhatsappDown ट्रेंड करत आहे.
सोशल मीडिया कंपनी मेटाने न्यूज एजन्सी रॉयटर्सला सांगितले की त्यांची टीम शक्य तितक्या लवकर सेवा पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करीत आहे. “आम्हाला माहिती आहे की काही वापरकर्त्यांना संदेश पाठवण्यात समस्या येत आहेत आणि आम्ही शक्य तितक्या लवकर प्रत्येकासाठी WhatsApp पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे मेटा प्रवक्त्याने सांगितले.
गार्डियनच्या अहवालात असे म्हटले आहे की व्हॉट्सअॅपची सेवा जागतिक स्तरावर डाउन झाली आहे, म्हणजेच या कालावधीत केवळ भारतीय वापरकर्त्यांवर परिणाम झाला नाही. अहवालानुसार, युनायटेड किंगडम आणि जगातील इतर देशांमधील वापरकर्त्यांनाही समस्यांचा सामना करावा लागत आहे. व्हॉट्सअॅप वापरकर्ते सध्याची संभाषणे पाहत आहेत परंतु ते कोणालाही संदेश पाठवू शकत नाहीत किंवा त्यांच्या नंबरवर कोणतेही संदेश येत नाहीत.
Diwali WhatsApp Down Users Facing Problem
Technology Social Media