मुंबई – फिरण्याची आवड असणाऱ्या लोकांची यादी गोव्याशिवाय कधी पूर्णच होऊ शकत नाही. तिथला निसर्ग, समुद्रकिनारे, चर्च, तिथली संस्कृती या साऱ्यांचंच पर्यटकांना आकर्षण असतं. हनिमूनसाठी देखील गोव्याला अनेकांची पसंती असते. पर्यटकांची हीच आवड लक्षात घेता आयआरसीटीसीने एक मस्त टूर प्लॅन आणला आहे. ‘ग्लोरियस गोवा एक्स मुंबई’ असे या पॅकेजचे नाव आहे. हे पॅकेज हवे असेल तर 11 हजार 990 म्हणजेच जवळपास 12 हजार रुपये खर्च करण्याची तयारी ठेवायला हवी.
तीन रात्री चार दिवसांचे हे पॅकेज आहे. दर शुक्रवारी रात्री मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) येथून रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी सुटणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसने तुमच्या प्रवासाला सुरुवात होते. रात्रभराचा प्रवास झाला की तुम्ही दुसऱ्या दिवशी उत्तर गोव्यातील थिविम स्टेशनवर पोहोचता. तेथून पर्यटकांना हॉटेलवर नेले जाते. फ्रेश होऊन मग पर्यटकांना उत्तर गोव्याच्या साईटसीनसाठी नेले जाते.
यात अगुआडा किल्ला, केंडोलीम, बाघा, अंजुना बीच, डोना पावलो तसेच कलंगुट बीच दाखवला जाईल. दुसऱ्या दिवशी पर्यटकांना दक्षिण गोव्याची सैर केली जाते. दक्षिण गोव्यात मीरामार बीच, ओल्ड गोवा चर्च, तसेच मंगेशी मंदिराला भेट देता येईल. शिवाय मांडवी नदीवर क्रूझच्या सफारीचा देखील आनंद घेता येईल. तेथून पुन्हा हॉटेलवर परतल्यानंतर दिवसभर आराम. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा थिविम येथून मुंबईसाठी वापसी. असा हा अत्यंत आटोपशीर कार्यक्रम आहे. गोव्यातील प्रमुख स्थळे याअंतर्गत दाखवण्याचा आयआरसीटीसीचा प्रयत्न आहे.
या सुविधा मिळणार
गोव्यावरून परतताना थर्ड एसी आणि सेकंड स्लीपर क्लासचा पर्याय आहे. आपल्या आवडीनुसार पर्यटकांना कोच निवडता येईल. पर्यटकांना स्टेशनवरून हॉटेलवर आणण्यासाठी आणि परत सोडण्याची व्यवस्था केली जाईल. याशिवाय साइटसिइंगसाठी एसी गाड्यांची सोय असेल.