इंडिया दर्पण दीपोत्सव विशेष
बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज
यंदाच्या दिवाळीचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज एकूण तीन सण एकत्र आले आहेत. ते म्हणजे, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज. अनेकदा यातील दोन उत्सव एकाच दिवशी येतात. मात्र, यंदा तिन्ही योग एकाच दिवशी आले आहेत. या तिन्ही उत्सवांचे महत्त्व आज आपण जाणून घेऊया…
बलिप्रतिपदा
कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात, या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला “शुभा” असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो.
दिवाळी पाडवा
पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतात. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात.
घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच “दिवाळसण” म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी – बैलांना रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू (पाठारे प्रभू) लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही प्रथा आहे.
गोवर्धन पूजा
मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.
भाऊबीज
कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला “यमद्वितीया” असे नाव मिळाले असे मानले जाते.बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो.भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच.
भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा करतात.
Diwali Special Balipratipada Padwa and Bhaubij by Vijay Golesar