इंडिया दर्पण
– दीपोत्सव विशेष लेख –
आज वसुबारस (गोवत्स द्वादशी)
पुन्हा एकदा दिवाळी आली आहे. उत्सव, प्रकाश आणि चैतन्य घेउन दिवाळी आली आहे. मागच्या दोन वर्षांच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी अधिकच उजळून निघाली आहे. प्रत्येक भारतीय स्त्री, पुरुष, लहान मुलं, मोठी माणसं, ज्याची वर्षभर आतुरतेने वाट पहात होती ती दिवाळी आली आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस.
गोवत्स द्वादशी किंवा ज्याला आपण सगळेच वसू बारस म्हणतो तो दिवाळीचा पहिला दिवस. भारत हा कृषि प्रधान देश आहे.आजही देशातील सत्तर-ऐंशी टक्के जनता आणि भारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे आपले सगळेच सण शेती आणि शेतकरी यांच्या जीवन पद्धतीशी निगडित आहेत.
शेतीशी संबंधित असलेला ‘पोळा’ हा सण महिन्यापुर्वीच होउन गेला.पोळयाच्या दिवशी आपण बैलांना सजवितो त्यांना पुरणपोळीचा घास भरवितो.या सणाची मिनी आवृत्ती म्हणजे वसुबारस! दिवाळीच्या या पहिल्या दिवशी गाई आणि वासरांची पूजा करणे त्यांना गोड धोड़ खाऊ घालून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो. हल्लीतर शहरातून अशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि गायींना नैवेद्य देण्यासाठी गायी देखील मिळत नाहीत. ग्रामीण भागात मात्र आजही गायी वासरांची आपुलकीने काळजी घेतली जाते. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व विशेष आहे. वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे.
या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत. त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. अनेक स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा असते.
धार्मिक ग्रंथांत या सणाविषयी असं म्हटलं आहे, ‘श्री विष्णूच्या आपतत्त्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस’ ! या दिवशी विष्णुलोकातील वासवदत्ता नामक कामधेनु या लहरींचे वहन ब्रह्मांडापर्यंत करण्यासाठी अविरत कार्य करते. या दिवशी या कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशीवृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते. या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते. यासाठीच या दिवसाला ‘वसुबारस’ असे म्हणतात. बारस म्हणजे एखाद्या गोष्टीत नवीन चैतन्यबीजाची निर्मिती होणे. हेच देवत्व तिच्या ठायी कायमस्वरूपी विष्णूरूप पाहून जिवाने टिकवायचे असते आणि तिच्यातून प्रक्षेपित होणार्या चैतन्यलहरींचा लाभ उठवायचा असतो.
आश्विन वद्य द्वादशीविषयी समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. पुढील अनेक जन्मांतील कामना पूर्ण व्हाव्यात आणि पूजा करत असलेल्या गायीच्या शरीरावर जितके केस आहेत, तितकी वर्षे स्वर्गात रहायला मिळावे हा व्रता मागचा .उद्देश आहे. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एक जेवण करुन सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.
आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
चला तर मग.दिवाळी सुरु झाली आहे. ‘इंडिया दर्पण’ च्या सर्व वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा.
आपणास ही दिवाळी आनंदाची ,सुखाची आणि समृद्धिची जावो हीच सदिच्छा!
संदर्भ : धार्मिक ग्रंथ
Diwali Special Article Vasubaras by Vijay Golesar