इंडिया दर्पण
– दीपोत्सव विशेष –
फटाके… पणत्या.. आकाशकंदिल… फराळ… फुले.. आणि बरंच काही
आज रविवार .दिवाळीचा तिसरा दिवस. खरं तर नियमानुसार आज नरकचतुर्दशी चा दिवस यायला पाहिजे होता .या दिवशी घरातली पुरुष मंडली सुर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान वगैरे करतात. परंतु पंचागातील तिथि घटल्या मुळे आज चक्क सुट्टी .दिवाळीच्या सणात थोडासा ब्रेक.
दिवाळी म्हटली की काही गोष्टी अटळ असतात. उदाहरणार्थ दिवाळीचा फराळ, दिवाळीतील फटाके, दिवाळीतले आकाशकंदील, पणत्या वगैरे वगैरे. दिवाळी म्हणताच आपल्या डोळ्यासमोर येतात ते नवनवीन पोशाख , गोडधोड पदार्थ ,फराळ , रोषणाई व प्रकाश दिवे आणि फटाके. या सणासुदीच्या दिवसात सर्वात जास्त उत्सुकता कोणती असते तर ती म्हणजे फटाके . बाजारात विविध प्रकारचे फटाके आणले जातात ते फोडल्यानंतर मनाला होणारा आनंद नगण्य आहे. तुम्हाला माहित आहे का या फटाक्यांचा शोध कोणी लावला असेल ? भारताच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम फटाके कोठे व कोणी बनवले याबद्दल फारशी माहिती अस्तित्वात नाही.
भारतात फटाके फोडल्याचा पुरावा १५ व्या शतकापासून सुरू होतो. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो 1953 मध्ये ‘भंडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे’ यांचे इतिहासकार आणि पहिले क्यूरेटर पीके गौड यांनी ‘द हिस्ट्री ऑफ फायरवर्क्स इन इंडिया बिटवीन एडी 1400 एंड 1900’ हे पुस्तक भारतीय इतिहासातील फटाके आणि फटाक्यांच्या मनोरंजक इतिहासाचे एक दुर्मिळ दस्ताऐवज आहे. आपल्या पुस्तकात गौड यांनी सांगितले मराठी संत कवी एकनाथ यांची , १५७० साली लिहिलेल्या एका कवितेमध्ये उल्लेख केला आहे कि रुक्मिणी आणि श्री कृष्ण यांच्या विवाहात आतषबाजी केली गेली होती. लग्नात आतषबाजी करणे हि चाल १९ व्या शतकात सुद्धा प्रतलीत होती.
फटाक्यांची राजधानी
तामिळनाडूमधील शिवकाशी हे फटाके बनवण्याचे सर्वात मोठे केंद्र आहे. पी. अय्या नादर आणि त्याचा भाऊ शानमुगा नादर यांनी येथे फटाके बनवण्यास सुरवात केल्याचे दिसते. कामाच्या शोधात दोघेही 1923 मध्ये कोलकाता येथे गेले होते. तेथील माचीस फॅक्टरीत काम करण्यास सुरवात केली. परत आल्यानंतर त्यांनी शिवकाशी येथे स्वतःची माचीस फॅक्टरी सुरू केली.त्यावेळी भारतात ब्रिटिशांनी स्फोटक कायदा लागू केला. यामध्ये फटाके फोडण्यासाठी वापरल्या जाणार्या कच्च्या मालाच्या विक्रीवर आणि फटाके बनविण्यास बंदी घालण्यात आली होती. या कायद्यात 1940 मध्ये सुधारणा करण्यात आली. विशेष पातळीवर फटाक्यांचा उत्पादनावर कायदेशीरपणा आला व नादर ब्रदर्सने पहिला फटाका कारखाना सुरू केला. आता शिवकाशी हा भारतातील फटाके निर्मात्यांचा गड मानला जातो.
लज्जतदार फराळ
भारतात सुमारे पाच हजार वर्षांपासून दिवाळी साजरी केली जाते असं म्हणतात.तेव्हा पासून आजवर दिवाळीच्या साजरीकरणात काळानुरूप अनेक बदल झाले असतील. परंतु आपल्याला आठवत तेव्हा पासून दिवाळीचा फराळ आणि दिवाळी यांचं अतूटनातं असल्याचं आपल्या लक्षात येतं. दिवाळी म्हटलं की डोळ्यासमोर फराळचे पदार्थ दिसू लागतात. दिवाळी येणार म्हटलं की आठवडाभर आधीपासूनच सुरू होतो तो घराघरातून येणारा दिवाळीच्या फराळाचा सुगंध. दिवाळी फराळाचे पदार्थ आपल्याकडे इतके असतात की प्रत्येक घरात याची रेलचेल असते. कितीही वेळ नसला तरीही वेळात वेळा काढून किमान चकली, चिवडा आणि लाडू आणि दिवाळी फराळ शंकरपाळे हे तरी घरात केले जातेच. दिवाळी फराळाचे पदार्थ म्हणजे तोंडाला पाणीच सुटते. दिवाळीच्या फराळात करंज्या ,पुर्या ,शेव,चकली ,चिवड़ा,लाडू, अनारसे,कडबोळी वर्षानुवर्षे मानाने मिरवतात.
नकारात्मक शक्तींना दूर ठेवणारी रांगोळी
दिवाळीत सगळं वातावरण एकदम वेगळे झालेले असते. दारोदारी रांगोळी काढली जाते. घरोघरी वेगवेगळ्या आकाराचे कंदील लावले जातात. दारात दिवे लावले जातात. रांगोळीचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे. कंदीलाचेही अगदी तसेच महत्व आहे. रांगोळी हे सौंदर्य आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. त्यामध्ये काढलेली प्रतीके ही मांगल्य, शक्ती, उदारपणा याची चिन्हे मानली जातात. रांगोळी ही सगळ्या नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्याचे काम करते.त्यामुळेच घरात काही आनंदाचे काही प्रसंग असतील तर त्या दिवशी अगदी हमखास रांगोळी काढलीच जाते. रांगोळी काढण्यामागे अशीही धारणा आहे की, त्यामुळे नशीब फळफळणे, चांगल्या गोष्टींना आमंत्रण देणे या गोष्टीसाठी रांगोळी काढली जाते.
सकारात्मक उर्जा देणारा आकाशकंदिल
आकाशकंदील हे देखील मांगल्याचे प्रतीक मानले जाते. आकाशकंदीलामुळे घरात सकारात्मक प्रकाश येण्यास मदत मिळते. आकाशकंदीलाचा रंग आणि त्याचा आकार हा आनंद प्रदान करणारा असतो. आकाशकंदील हा दिवाळी सणाचा विशेष मानला जातो. या सणाला स्वतःच्या राहत्या घराबाहेर बाहेरच्या लोकांना दिसेल अशा उंच जागी व शक्यतोवर पूर्व दिशेस हा आकाशदिवा (आकाशकंदील) लावला जातो. हा आकाशकंदील पारंपरिकरीत्या बांबूच्या कामट्या व रंगीत कागदापासून तयार केला जातो. अलीकडील काळात आकर्षक प्लास्टिकचे वा कागदापासून बनवलेले आकाशकंदील विकत मिळतात. दिवाळी सणानिमित्त विविध रंगाचे, प्रकारचे आकाशकंदील बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असतात तसेच भारतात तयार होते असलेल्या कंदीलाना परदेशात मागणी असते. भारतातील दीपावलीप्रमाणेच चीन व जपानमध्येही वेगवेगळ्या प्रसंगांनुसार आकाशदिव्यांच्या वापराची प्रथा आहे.
आध्यात्मिक महत्त्व
कार्तिक महिन्यात सूर्यास्ताच्या वेळेला घराच्या बाहेर आकाशदिवा लावावा असे हिंदू धर्मशास्त्र सांगते.घराच्या बाहेर अंगणात जमीन साररवून मध्यभागी यज्ञाला उपयोगी असे लाकूड मधोमध खड्डा खणून पुरावे.त्यावर आठ पाकळ्यांचे दिव्याचे तयार केलेले यंत्र टांगावे. या यंत्राच्या मधोमध दिवा लावावा. त्याच्या आठ पाकळ्यात आठ दिवे लावावेत आणि हा दिवा देवाला अर्पण करावा असे सांगितले आहे. आकाशकंदील घरी तयार करण्याची पद्धती महाराष्ट्र राज्यात आणि अन्य राज्यातही दिसून येते. घरातील लहान मुले दिवाळीच्या सुट्टीत घरी आकाशकंदील तयार करतात.
अंगण प्रकाशाने उजळून टाकणारी पणती!
दिवाळीमध्ये सर्वाधिक महत्त्व दिले जाते ते पणत्यांना. खरे तर वसुबारसेपासूनच दिवाळी या दीपोत्सवाला सुरुवात होते, आणि बघता बघता या पणत्यांमुळे घराचे अंगण प्रकाशाने उजळून जाते. मंगलमय वातावरणात रंग भरणाऱ्या दिव्यांमध्ये दर वर्षी नवनवीन प्रकार बघायला मिळतात.
काही वर्षांपूर्वी कुंभारवाड्यात एकाच साच्यातून तयार होणाऱ्या पारंपरिक पणत्याच बाजारपेठेत पाहायला मिळत होत्या. हळूहळू पत्र्याच्या मेणाच्या, काचेच्या पणत्यांचा यात भर पडली. कालांतराने कारागिरांनी विविध प्रकारच्या नक्षीदार पणत्या करायला सुरुवात केली. या पणत्यांनाही ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यानंतर कुंदन, मोती आदी गोष्टींनी सजवलेल्या पणत्याही बाजारात उपलब्ध झाल्या.
खास लक्ष्मीपूजनासाठी या पणत्यांची खरेदी केली जाते. यातही हंडी, लामण दिवा, नारळ, ताम्हन असे विविध आकार उपलब्ध आहेत. या पणत्या पंचवीस रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत विविध किमतीत उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे साध्या पणत्यांचीही खरेदीत घट झालेली नाही. या वर्षी तर कुंभारवाड्यातील कारागिरांनी पणत्यांचे लॅम्प तयार केले आहेत, त्यांनाही चांगली मागणी आहे.
(संदर्भ – धार्मिक ग्रंथ)
Diwali Special Article Fire Crackers Lanterns by Vijay Golesar