ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये प्रचंड वाद-विवाद, भांडणे आणि कोर्ट कचऱ्या सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी दसरा मेळाव्यावरून दोन्ही गटांमध्ये मोठा वाद रंगला. तो वाद शमत नाही तोच आता दिवाळी पहाटच्या कार्यक्रमावरुन दोन्ही गट आमने सामने आले आहेत. दिवाळी पहाटच्या जागेवरून वाद रंगला आहे. दोन्ही गटांनी ठाण्यात एकाच जागेवर दावा केला असून आता या दोन्ही गटांचा दिवाळी पहाट कार्यक्रम नेमका कोठे होतो याची सर्वांना उत्सुकता लागून आहे.
पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून दिवाळी पहाट, पाडवा पहाट, भाऊबीज पहाट वगैरे सारखे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यास प्रसिद्ध तथा नामवंत गायक, वादकांची उपस्थिती असते. या कार्यक्रमासाठी राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांचे आर्थिक पाठबळ मिळते. आता अशा प्रकारचे कार्यक्रम राज्यातील जळगाव, मालेगाव, वाई, सातारा, कोल्हापूर, बीड, लातूर, संगमनेर अशा अनेक शहरांमध्ये होत असतात. परंतु दिवाळी पहाट कार्यक्रमाची खरी परंपरा पुणे आणि नाशिक या शहरातून सुरू झाली असे म्हटले जाते.
ठाणे शहरातही यंदा दिवाळी पहाट हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. गेल्या दहा वर्षांची येथे परंपरा आहे. आता याच दिवाळी पहाट कार्यक्रमावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा आमने-सामने येत वाद रंगला आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या संस्थेच्या माध्यमातून डॉ. मुस रोड येथे दरवर्षी दिवाळी पहाट आयोजित केली जाते. त्यामुळे प्रथम आम्ही परवानगी मागितल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. तर दुसरीकडे आम्ही प्रथम महापालिका आणि पोलिसांना पत्र दिल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे आता दिवाळी पहाट कोणाची साजरी होणार, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. दोन्ही गटांनी दोन दिवाळी पहाटचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी केले तर त्या त्या परिसरातील नागरिकांना या कार्यक्रमाचा चांगला लाभ घेता येईल. परंतु त्यासाठी हा वाद विवाद थांबवून सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक आहे, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे आहेत. त्यामुळेही या वादाला आणि दिवाळी पहाट कार्यक्रमाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. महिनाभरापूर्वी मुंबईत दसरा मेळाव्याआधी दोन्ही गटाकडून शिवतीर्थावर दावा केला गेला, त्याचप्रमाणे आता ठाण्यात दिवाळी पहाटच्या कार्यक्रम स्थळासाठी दोन्ही गटांकडून दावा झाला आहे. दहा वर्षे युवा सेनेचे पदाधिकारी नितीन लांडगे हे सर्वांना कार्यक्रमाकरिता पत्र देत असून त्यांच्या पत्रावर परवानगी दिली जात असल्याचे शिंदे गटाने सांगितले. लांडगे हे शिंदे गटात सामील झाल्याने त्यांनी यंदा दि. १९ सप्टेंबर रोजी महापालिका आणि पोलिसांकडे परवानगी मागितली व त्यांना लगेच देण्यात आली, असेही शिंदे गटाने सांगितले आहे.
विशेष म्हणजे चिंतामणी चौकातील जागा देखील शिंदे गटाने मागितली असून गेली १० वर्षे आमच्या संस्थेच्या माध्यमातून ठाण्यात दिवाळी पहाट साजरी केली जात असल्याने आम्ही परवानगी मागितली होती. मात्र ठाणे महापालिकेने आम्हाला देखील त्याच ठिकाणी परवानगी दिली असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. शिंदे गटाकडून उशिरा पत्र देण्यात आले असून मागची तारीख टाकण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाने केला.
ठाकरे गटाने मुस रोडसाठी परवानगी मागितली नसल्याचा दावा शिंदे गटाने केला. गडकरी रंगायतन येथे दिवाळी पहाट साजरी करण्याची परवानगी ठाकरे गटाने मागितली असल्याचे सांगितले जात आहे, परंतु गेली १० वर्षे आम्ही ज्याठिकाणी दिवाळी पहाट साजरी करीत आहोत, त्याच ठिकाणी यंदाही पहाट साजरी केली जाणार असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे. परंतु या दोघांच्या जागेवरून चाललेल्या भांडणामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाचे नेमके काय होणार? याची देखील चिंता रसिकांना लागून आहे.
Diwali Pahat Shinde Thackeray Group Controversy
Thane Eknath Shinde Uddhav Thackeray Cultural