शिर्डी – दिवाळीच्या सुट्या लागल्यामुळे सहाजिकच अनेकांना शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेण्याची इच्छा असते. त्यामुळेच दिवाळीच्या सुट्यांमध्ये शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी असते. खासकरुन दिवाळी पाडव्याच्या दिवशी किंवा भाऊबीजेनंतर भाविकांचा मोठा ओघ शिर्डीमध्ये सुरू होतो. मात्र, यंदा तुम्ही शिर्डीला दर्शनासाठी येत असाल तर आपल्याला काही बाबींची दखल घ्यावी लागणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती लक्षात घेता धार्मिक स्थळांवर व प्रार्थनास्थळांवर कोरोना नियमावलीचे कोटकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. मंदिर प्रशासन व शासकीय विभागाद्वारे तशी खबरदारी घेतली जात आहे. ऑनलाईन पास असलेल्या भक्तांनाच शिर्डी श्री. साईबाबा मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. दररोज 15 हजार भक्तांना प्रवेश दिला जाईल. प्रसादालय सध्या बंद ठेवण्यात आले आहे.
दि.७ ऑक्टोबरपासून शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. भाविकांना 6 फुटांचे अंतर पाळणे, मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक आहे. सॅनिटायझरने वारंवार हात धुणे, या कोरोना नियमावलींचे मंदिर व परिसरात सक्तीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच मंदिर प्रवेशापूर्वी प्रत्येक भक्तांचे थॅर्मल स्कॅनरद्वारे शरिराचे तापमान तपासले जात आहे.
कोविड-19 ची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. यामध्ये 10 वर्षाखालील बालकांना, गरोदर स्त्रिया, 65 वर्षावरील व आजारी व्यक्तीत तसेच मास्क न वापरणा-या भक्तांना जिल्ह्यातील मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरात प्रवेश देतांना कोवीड लसीकरण प्रमाणपत्र देण्याची सक्ती केली जाणार नाही. दर्शनासाठी येतांना पुजेचे साहित्य आणू नये. पुजेच्या साहित्यासह आत प्रवेश दिला जाणार नाही. मात्र जास्तीत जास्त भाविकांनी कोरोना लसीकरण करूनच मंदिर प्रवेश करावा. असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.