मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय सण, परंपरा आणि सुवर्ण यांचा पिढीजात संबंध आहे. विशेषत: साडेतीन मुहूर्तावर, तसेच गुरूपुष्यामृत या मुहूर्तावर अनेकजण सोने खरेदी करत असतात. लग्नसराईतील दागिण्यांसाठी, प्रिय व्यक्तीला भेट देण्यासाठी म्हणून आणि आयुष्यभराची सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला भारतीय माणूस अनन्यसाधारण प्राधान्य देतो. दसरा दिवाळीत तर सोने खरेदीचा उत्साह वाखाणण्यासारखा असतो. घरच्या महिलेला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. तिच्यासाठी लक्ष्मीचे प्रतिक असलेल्या सोन्याची खरेदी आवर्जून होतेच. त्यातही धनत्रयोदशी किंवा धनतेरस आणि पाडव्याला सोने खरेदीचा मूहूर्त साधला जातो. अर्थात त्यात गुंतवणुकीचा छुपा उद्देश असतोच. यंदाही आपण जर सोने खरेदीसाठी उत्सुक असाल तर ही माहिती आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे यंदा अनेकांना फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे सोने खरेदीचा विचार पुढे ढकलण्याचा विचार अजिबात करू नका. हा फायदा दुहेरी होऊ शकतो असे या क्षेत्रातील जाणकार असलेल्या मोतीलाल ओसवाल या कंपनीने वर्तविले आहे. पहिला फायदा हा कि आता सोन्याच्या किंमती आपल्या आवाक्यात असू शकणार आहेत.
दुसरा फायदा हा की, सध्या सोने प्रति दहा ग्रॅमला सव्वा लाख रुपयांवर गेले असले तरी लग्नसराईत सोन्याचे दर दीड लाखांच्या आसपास जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आताची बचत ही भविष्यातील गुंतवणूकीतील फायदा करून देणारी ठरणार आहे. अर्थात या किंमती खरंच वाढणार का? त्यामागे काय कारण आहे हे जाणून घेण्याची तुमची उत्सुकता नक्कीच आम्ही समजू शकतो.
गुंतवणूकदारांच्या मते सोने खरेदीकडे लोकांचा कल वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव चढेच राहणार असल्याचे या क्षेत्रातले जाणकार सांगत आहेत. त्यामुळे आगामी वर्षभरात सोने दोन लाखांच्या आसपास गेल्यास नवल राहणार नाही.
2019 आणि 2020 मध्ये सोन्याच्या भावात वृद्धी होत होती. परंतु नंतर आलेल्या कोरोना महासाथीने सोने खरेदीवर चांगलाच परिणाम झाला आणि ते 47 ते 49 हजार प्रति दहा ग्रॅम इथपर्यंत घसरले. कोरोना प्रतिबंध हटविल्यानंतर बाजारपेठेत चैतन्य आले आणि सोने खरेदीकडेही कल वाढू लागला. त्यानंतर गेल्या चार वर्षातील जागतिक घडामोडी, युद्ध यामुळे सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे भाव आता कायमस्वरूपी वाढते राहणार असून आता ज्या किंमती आहेत, त्या भविष्यातील किंमतींच्या तुलनेत कमी राहणार आहेत. म्हणूनच ही सोने खरेदीची सुवर्ण संधी असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत.