दिव्यांगांसाठी खुषखबर…
हे ॲप डाऊनलोड करा आणि सरकारी योजनांचा लाभ घ्या…
विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ‘लाभार्थी सत्यापन ॲप’ ठरत आहे वरदान !
अहिल्यानगर जिल्ह्यातील ११ हजार ३७२ लाभार्थ्यांनी दिले घरबसल्या हयातीचे दाखले
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रशासन जनतेच्या दारी !
अहिल्यानगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासनाच्या विविध सामाजिक योजनांचा लाभ घेण्यासाठी वयोवृद्ध, विधवा तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना दरवर्षी ‘हयातीचे प्रमाणपत्र’ सादर करावे लागते. यासाठी त्यांना तहसील, पंचायत समिती किंवा इतर शासकीय कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत असत. मात्र, अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाने विकसित केलेल्या ‘लाभार्थी सत्यापन ॲप’मुळे ही प्रक्रिया आता घरबसल्या सुलभ झाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात केंद्र पुरस्कृत योजनांतील ३८ हजार ८०२ लाभार्थ्यांपैकी ११ हजार ३७२ लाभार्थ्यांनी या प्रणालीचा लाभ घेतला आहे. राज्य पुरस्कृत योजनांनाही ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू असून, या उपक्रमामुळे लाभार्थ्यांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात वाचत आहे. शासनाची सेवा आता प्रत्यक्ष जनतेच्या दारी पोहोचत आहे.
या ॲपद्वारे लाभार्थी आपल्या मोबाईलवरूनच हयातीचे प्रमाणपत्र सादर करू शकतात. त्यासाठी ‘आधार फेस आयडी’ ॲप आणि ‘लाभार्थी सत्यापन ॲप’ हे दोन्ही गुगल भांडारातून (Google Play Store) उतरवून, आधार क्रमांक भरल्यानंतर मोबाईल कॅमेरामधून चेहऱ्याद्वारे ओळख पूर्ण केली जाते. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया काही क्षणांत पूर्ण होते.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, “पूर्वी लाभार्थ्यांना कार्यालयात येऊन प्रत्यक्ष सत्यापन करावे लागत होते. आता मोबाईल ॲपच्या माध्यमातून आधार क्रमांक भरून व चेहरा दाखवून सत्यापन करता येते. यामुळे लाभार्थ्यांचा शारीरिक त्रास कमी झाला असून प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक बनली आहे.”
विशेष सहाय्य योजनेचे जिल्हा समन्वयक रवींद्र घावटे म्हणाले, “ तत्कालीन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या संकल्पनेतून या प्रणालीला शासनाची मान्यता मिळाली. प्रायोगिक स्वरूपात सुरू झालेला हा उपक्रम आता देशभर लागू करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात जुलै २०२५ पासून या उपक्रमास सुरूवात झाली. अहिल्यानगर जिल्ह्यात आजअखेर ११ हजार ३७२ लाभार्थ्यांना या प्रणालीचा थेट लाभ झाला आहे.”
लाभार्थी मुन्नी निलोफर शेख म्हणाल्या, “पूर्वी तहसील कार्यालयात वारंवार जावे लागायचे. आता मोबाईलवरूनच हयातीचा दाखला देता येतो. यामुळे वेळ आणि श्रम दोन्ही वाचले.”
“पूर्वी हयातीच्या दाखल्यासाठी चकरा माराव्या लागत होत्या. आता मोबाईलवरूनच सत्यापन होत असल्याने वृद्धांना मोठा दिलासा मिळाला आहे.”अशी प्रतिक्रिया लाभार्थी विमल लोखंडे यांनी दिली.
अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच १०० टक्के आधार संलग्नीकरण व प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली प्रभावीपणे राबवली आहे. त्याच धर्तीवर विकसित झालेल्या या ॲपमुळे शासनाचे कामकाज अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि जनसुलभ झाले आहे.
तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शासनाचे कामकाज सुलभ, वेगवान व जनतेला थेट दिलासा देणारे ठरते. याचे लाभार्थी सत्यापन ॲप’ हे उत्तम उदाहरण आहे. अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आज राज्यातील प्रशासनासाठी प्रेरणादायी ठरत आहे.