नाशिक – जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत 12 डिसेंबर 2021 पासून ते 12 मार्च 2022 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र व ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे, असे जिल्हा परिषदचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून घेण्यासाठी 2 डिसेंबर 2021 च्या शासन निर्णयान्वये जिल्हास्तरावर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम राबविण्याबाबत सर्व शासकीय समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली असून, जिल्हा रूग्णालयामार्फत आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी कळवण, मालेगाव आणि नाशिक येथे नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेतंर्गत दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहनही जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.