नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निराधार, बेवारस बालकांवरील अत्याचाराच्या घटनांनी शहर परिसर सध्या हादरुन गेला आहे. नुकताच बाल लैंगिक शोषण प्रतिबंध दिन झाला. उद्या (३ डिसेंबर) जागतिक दिव्यांग दिन आहे. घारपुरे घाटाजवळच्या आधाराश्रम संस्थेत वयोमर्यादा पूर्ण केलेली १० बहुविकलांग बालके असून त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांना नियमानुसार योग्य संस्थेत दाखल करण्याची गरज आहे. यानिमित्ताने अनेक बाबी अधोरेखित होत आहेत.
नाशिकमध्ये आधाराश्रम ही संस्था गेली ६८ वर्षे निराधार बालकांना आधार देऊन त्यांच्या संगोपनाचे, पुनर्वसन करण्याचे काम करते. मातापित्यांनी टाकून दिलेली, अनौरस, एकल पालकांची तसेच बेवारस आढळलेली बालके जिल्हा रुग्णालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष व जिल्हा बालकल्याण समिती या संस्थांच्या मार्फत कायदेशीर प्रक्रिया करून आधाराश्रमात दाखल होतात. एक दिवस ते ६ वर्षे वयाचे ३० मुलगे तर एक दिवस ते १२ वर्षे वयाच्या ९० मुली सध्या येथे आहेत. या आकड्यांवरून अजूनही समाजात मुलींना स्वीकारण्याचा दृष्टिकोन किती संकुचित, नकारात्मक व अपरिपक्व आहे हे लक्षात येते.
आधाराश्रमाचे सचिव हेमंत पाठक म्हणाले, त्र्यंबकेश्वर जवळच्या एका निराधार बालकाश्रमात चिमुकल्या जीवाचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याचा विनाकारण मनस्ताप आधाराश्रम संस्थेला सहन करावा लागला. कारण नामसाधर्म्यामुळे अनेकांनी आमच्याशी संपर्क साधून शहानिशा केली. पाठोपाठ म्हसरुळ परिसरातील गुरुकुल निवासी वसतिगृहात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाली. गतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटनाही समोर आली. चुंचाळे भागात एक दिवसाच्या नकोश्या बालिकेला जन्मदात्यांनीच पिशवीत कोंबून फेकले. कुत्र्यांनी लचके तोडल्याने चिमुकलीला मृत्यूच्या बळी पडावे लागले. अश्या वारंवार घडणाऱ्या दुर्दैवी घटनांनी समाज हादरुन गेला आहे. आम्ही समाजाला आवाहन करतो की, नकोशी बाळे आम्हाला द्या. कोणालाही निराधार, बेवारस बालके आढळल्यास १०९८ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी.
पाठक पुढे म्हणाले, बालके संस्थेत दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी बालकांचे अपंगत्व लक्षात येते. त्यानुसार उपचार केले जातात. काही बालकांमध्ये बहुविकलांगत्व असते. त्यांची विशेष देखभाल करावी लागते. सध्या संस्थेत अशी वयोमर्यादा ओलांडलेली ४ बहुविकलांग मुले व ६ मुली आहेत. त्यांच्या वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या समस्याही वाढलेल्या आहेत. त्यांना खास दिव्यांगांसाठी असणाऱ्या संस्थांमध्ये नियमानुसार दाखल करावे अशी आम्ही सातत्याने मागणी करीत आहोत. मात्र संबंधितांकडे पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नाही.
जिल्हा बालसंरक्षण कक्ष व जिल्हा बालकल्याण समिती यांचे मार्गदर्शन, आदेशाने व कायदेशीर प्रक्रियेनुसार आधाराश्रमचे कार्य सुरू असते. येथील बालकांना शालेय शिक्षणा सोबतच कलात्मक वस्तू बनवणे, योगा, शिवणकाम, वैयक्तिक व आधाराश्रमाची स्वच्छ्ता अश्या अनेक गोष्ट शिकवल्या जातात. आधाराश्रम ही नाशिक जिल्ह्यातील दत्तक देणारी एकमेव व मान्यताप्राप्त संस्था आहे. आजपर्यंत आधाराश्रमातून सुमारे १००० बालके दत्तक दिली गेली आहेत. त्यापैकी ८५ बालके परदेशात पोहोचली असून सर्वजण कुटुंबात आनंदी आहेत.आज जागतिक दिव्यांग दिनानिमित बहुविकलांग बालकांचे शास्त्रीय दृष्ट्या संगोपन व्हावे यासाठी शासनाने आम्हाला सहकार्य करावे ही माफक अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Divyaang Disable Alone Children’s Issues
Aadharashram Adoption