इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अवघ्या १९ वर्षाच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धिबळाच्या (FIDE) विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपीला हरवून विजेतेपद मिळवले. या यशाबद्दल दिव्या देशमुखचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले: दोन उत्कृष्ट भारतीय बुद्धिबळपटूंमधील ऐतिहासिक अंतिम सामना ! फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2025 जिंकणाऱ्या युवा दिव्या देशमुख हिचा अभिमान वाटतो. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन, यामुळे युवावर्गाला प्रेरणा मिळेल.
कोनेरू हम्पीने देखील संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. दोन्ही खेळाडूंना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.”
तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, दोन भारतीय महिला बुद्धिबळाच्या पटावर विश्वविजयासाठी चाली रचत आहेत हे दृश्यच खूप सुंदर आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत भारताकडेच विश्वविजय पद आलं असतं हा देखील आनंदाचा भाग. पण दिव्याचं मनापासून अभिनंदन. या निमित्ताने अधिकाधिक महिला बुद्धिबळपटू तयार होऊ देत, त्यांना विजयाला गवसणी घालण्याची प्रेरणा मिळू दे हीच इच्छा… महाराष्ट्राकडे बुद्धी आणि बळ दोन्ही ओतप्रोत आहे, ते जेंव्हा जेंव्हा महाराष्ट्राचं नाव मोठं करायला वापरलं जातं तेंव्हा खूप आनंद होतो. दिव्या तुझं पुन्हा एकदा अभिनंदन…